जागतिकीकरणामुळे पत्रकारितेच्या क्षेत्रातही चांगल्या संधी निर्माण झाल्या. मात्र, आधुनिक तंत्रज्ञानाच्या वेगवान विकासामुळे इंटरनेटवरील सोशल साईटने आता प्रत्येक माणूसच घडलेली बातमी देऊन बातमीदाराची भूमिका निभावू शकणार आहे. त्यामुळे पत्रकारितेच्या क्षेत्रात निर्माण झालेल्या संधी अशाच कायम राहतील, या भ्रमात न राहता या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांनी स्वत:वर विश्वास ठेवून माध्यम क्षेत्रातील बदल आत्मसात करून बातमीसाठी परिश्रम व धाडस दाखवले पाहिजे, असे आवाहन संपादक राजीव खांडेकर यांनी केले. येथील वसंतराव काळे पत्रकारिता महाविद्यालयात एबीपी माझा वाहिनीचे संपादक राजीव खांडेकर यांचे ‘इलेक्ट्रॉनिक माध्यमातील संधी व ग्रामीण युवक’ या विषयावर व्याख्यान झाले. संस्थेचे रमेश पोकळे, पत्रकार संघाचे अध्यक्ष वसंत मुंडे, संतोष मानूरकर, महेश वाघमारे, माजी आमदार नारायण मुंडे व डॉ. सतीश साळुंके उपस्थित होते. खांडेकर म्हणाले की, आता ई पेपर आणि टॅबलेट, लॅपटॉप आल्यामुळे या क्षेत्रात झपाटय़ाने बदल झाला आहे. बदलते तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे व स्वत:ची ओळख निर्माण केली तर या क्षेत्रात टिकणे शक्य आहे. पूर्वी केवळ दूरदर्शन एवढे एकच माध्यम होते. मात्र, आता प्रत्येक विषयावर वाहिन्या सुरू झाल्या आहेत. अमेरिकेत तर वेबसाईटवरून चॅनलवरील कार्यक्रम पाहिले जातात. आगामी काळात आणखी आधुनिक तंत्रज्ञान येईल आणि वृत्तवाहिन्या व दैनिकांची मक्तेदारी राहणार नाही, असे मतही त्यांनी व्यक्त केले.