मूलभूत हक्कांच्या प्रश्नांवर एकजुटीने लढण्याचा निर्धार येथील हुतात्मा स्मारकात आयोजित सामाजिक क्षेत्रात विविध संस्थांच्या माध्यमातून कार्यरत कार्यकर्त्यांच्या समन्वय बैठकीत घेण्यात आला.
बैठकीत मार्गदर्शन करताना अ‍ॅड. असीम सरोदे यांनी कायदा उपलब्ध असल्यास तेथे त्याचा प्रभावी वापर करून आणि कायदा उपलब्ध नसलेल्या ठिकाणी कायद्याचा अर्थ लावून किंवा न्याय यंत्रणेवर नैतिक दबाव निर्माण करून सामाजिक प्रश्न सोडविण्याचा मार्ग आपण अनुसरला पाहिजे असे नमूद केले. समाजात संपूर्ण समानता आणणे अशक्य आहे. मात्र असमानता कमी करणे शक्य आहे. त्यामुळे जेथे अशा प्रकारची कमीत कमी असमानता असेल अशा समाजाच्या निर्मितीसाठी आपण सर्वानी झटले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. मूलभूत हक्क आंदोलनाचे सचिन मालेगावकर यांनी सर्व संघटनांनी स्वत:ची ओळख स्वतंत्रपणे ठेवून एकत्रितपणे लढा देण्याची गरज व्यक्त केली. कायद्याच्या शस्त्राचा वापर करून सामाजिक चळवळ अधिक धारदार आणि प्रभावी कशी होईल याचा विचार केला पाहिजे, असेही सांगितले. स्वस्त धान्य वाटप, वन जमिनी, आश्रमशाळांची स्थिती असे अनेक गंभीर विषय सध्या समोर आहेत. या विषयासंदर्भात कायद्याच्या पातळीवर हस्तक्षेप करण्यात येऊन लवकरात लवकर न्याय मिळविण्यासाठी संघटित प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत बागलाण सेवा समितीचे राजू शिरसाठ यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कृष्णा चांदगुडे, प्रा. डॉ. सुदेश घोडेराव, अ‍ॅड. राजपाल राणा, सचिन मालेगावकर आदींनी आयोजित केलेल्या या बैठकीस पुण्याच्या सहयोग ट्रस्टचे अ‍ॅड. विकास शिंदे, ह्युमन राइट्स लॉ डिफेंडर्सचे अ‍ॅड. भालचंद्र सुपेकर, लोकभारती समाज सेवा संस्थेच्या नीलिमा साठे, वकील विचार मंचचे अ‍ॅड. अरुण दोंदे, अ‍ॅड. अर्चना महाले, भ्रष्टाचारविरोधी जन आंदोलन समितीचे निशिकांत पगारे आदी उपस्थित होते.