केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त येथे आयोजित राज्यस्तरीय परभणी महापौर हाफ मॅरेथॉन स्पर्धेत कोल्हापूरच्या दीपक कुंभार याने एक तास पाच मिनिटांत जिंकून मानाचा करंडक पटकावला. पुण्याचा दीपक कुमार दुसऱ्या, नाशिकचा दत्ता बोरसे तिसऱ्या, तर मुंबईचा सचिन पाटील चौथ्या स्थानावर राहिले.
पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महापौर प्रताप देशमुख व शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. स्वराज परिहार यांच्या वतीने आयोजित २१ किलोमीटर अंतराच्या अर्धमॅरेथॉन स्पर्धेला देशातून व राज्यातून धावपटूंचा मोठा प्रतिसाद मिळाला. या गटात ४५०पेक्षा अधिक धावपटूंनी सहभाग घेतला असला तरी कोल्हापूर, पुणे, नाशिक, मुंबई, नागपूरच्या धावपटूंनी स्पर्धेदरम्यान सर्वाचे लक्ष वेधले. संत तुकाराम महाविद्यालयाच्या परिसरातून सुरू झालेली ही स्पर्धा जिंतूर रस्त्यावरील साईनगरी ते परत जिल्हा क्रीडासंकुल अशा मार्गावर घेण्यात आली.
सुरुवातीपासूनच आघाडी घेतलेल्या कोल्हापूरच्या दीपक कुंभार याने शेवटपर्यंत आपली आघाडीची जागा कायम ठेवली. पुण्याचा दीपक कुमार, नाशिकचा दत्ता बोरसे, मुंबईचा सचिन पाटील व नवीन हुड्डा, नगरचा दत्तात्रय जायभाये, नाशिकचा सावळाराम शिंदे हे धावपटू १२-१३ किलोमीटर अंतरापर्यंत एकमेकांसोबत धावत होते. त्यानंतर मात्र दीपक कुंभार याने सर्वाना मागे टाकत मोठी आघाडी घेतली. ही आघाडी शेवटपर्यंत टिकवत त्याने स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. एक मिनिटाने उशिरा आलेल्या पुण्याच्या दीपक कुमार यास उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. नाशिकचा दत्ता बोरसे तिसऱ्या, तर मुंबईचा सचिन पाटील चौथ्या क्रमांकावर राहिले. मुंबईच्या सोझे मॅथ्यू याने पाचवे, नवीन हड्डा (पुणे) याने सहावे स्थान प्राप्त केले. १२ कि.मी. अंतराच्या स्पर्धेसाठी २० वर्षांखालील गटात पाराजी गायकवाड (प्रथम), ज्ञानेश्वर पोले (द्वितीय), शेख इब्राहिम (तृतीय), महेंद्र तुपसमिंद्रे (चौथा) यांनी यश प्राप्त केले.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण माजी मंत्री सुरेश वरपुडकर, अभिनेते संजय नार्वेकर, क्रिकेटपटू इक्बाल सिद्दिकी, राष्ट्रवादीचेविजय भांबळे, प्रदेश सरचिटणीस डॉ. मधुसूदन केंद्रे, माजी जिल्हाध्यक्ष विजय वरपुडकर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष समशेर वरपुडकर, माजी खासदार सुरेश जाधव, उपमहापौर सज्जु लाला, स्थायी समितीचे सभापती विजय जामकर, शहराध्यक्ष अलीखान, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष शशिकला चव्हाण, रवि सोनकांबळे, डॉ. धर्मराज चव्हाण, प्रमोद वाकोडकर, नगरसेवक यांच्या उपस्थितीत झाले. आयोजक महापौर प्रताप देशमुख, शहर जिल्हाध्यक्ष स्वराजसिंह परिहार तसेच राज्य अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे स्पर्धा निरीक्षक प्रा. मोईन फारुकी, स्पर्धा समन्वयक प्रा. डॉ. माधव शेजूळ आदींची या वेळी उपस्थिती होती.
 विजेत्यांना रोख पारितोषिके, करंडक, प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले. तब्बल अडीच लाखांची बक्षिसे या वेळी धावपटूंना देण्यात आली. शहरातल्या ३५ खेळाडूंचा सत्कारही याच कार्यक्रमात करण्यात आला. आपल्या भाषणात महापौर श्री देशमुख यांनी सर्वाचे आभार मानले.
स्थानिक खेळाडूंना अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्थानिक पातळीवरच सुविधा आवश्यक आहेत. तेथेच ते खऱ्या अर्थाने क्रीडाविकास साधू शकतात. महापालिकेने अद्ययावत अकादमी सुरू करावी, अशी अपेक्षा सिनेअभिनेते संजय नार्वेकर, क्रिकेटपटू इक्बाल सिद्दिकी यांनी व्यक्त केली.