येथील संत श्री आसाराम बापू आश्रमाच्या वतीने २४ व २५ नोव्हेंबर रोजी गंगापूर रोड येथील सावरकरनगर परिसरातील आश्रमात आध्यात्मिक दिवाळीचे आयोजन करण्यात आले आहे.
महोत्सवाचे वैशिष्टय़ म्हणजे श्री आसाराम बापू संघाच्या वतीने देशभरात असलेल्या ११ हजार समित्यांच्या माध्यमातून हा महोत्सव साजरा करण्यात येतो. आध्यात्मिक दिवाळी महोत्सवाची सुरुवात शनिवारी सकाळी ११ वाजता ऋषीप्रसाद ग्रंथदिंडीने होणार आहे. शहरातील प्रमुख भागांतून ही दिंडी जाणार असून त्याद्वारे अध्यात्माचा जागर करण्यात येणार येईल. दिंडीचे ठिकठिकाणी पूजन करण्यात येणार असून सावरकरनगर येथील आश्रमात दिंडीचा समारोप होईल. रविवारी पहाटेपासून महोत्सवाला प्रारंभ होईल. त्यामध्ये ध्यान, भजन, माला शुद्धीकरण यांसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारच्या सत्रात सांस्कृतिक कार्यक्रमासह ऋषीप्रसाद आध्यात्मिक ज्ञान स्पर्धा, सेवा अनुष्ठान, प्रशिक्षण, यांचे आयोजन करण्यात आले आहेत. विविध स्पर्धेतील विजेते, साधक यांचा या वेळी सत्कार करण्यात येणार आहे.
महोत्सवात पाच हजारांहून अधिक साधक, सेवक, भक्त सहभागी होणार असल्याची माहिती आश्रमाच्या वतीने देण्यात आली आहे. महोत्सवाप्रसंगी श्री आसाराम बापू हे व्हिडीओद्वारे भाविकांना मार्गदर्शन करतील. अधिक माहितीसाठी ०२५३-२३४२३४० या क्रमांकावर संपर्क साधावा. महोत्सवाचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आश्रमाच्या वतीने करण्यात आले आहे.