राज्य सरकारच्या अनुदानातून होत असलेल्या जिल्हा सांस्कृतिक महोत्सवातून ग्रामीण महाराष्ट्राचे अविभाज्य अंग असलेल्या तमाशा व लावणी या पारंपरिक कलांनाच लांब ठेवले जात आहे. जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागात ही कला जपणारे कलावंत यामुळे नाराज झाले असून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे या कलांचा समावेश महोत्सवात करावा अशी आग्रही मागणी केली आहे.
निलंकठ चौरे, हसन शेख, पाटेवाडीकर, शाहीर शेषराव पठाडे, हमीद सय्यद आदींनी ही मागणी केली आहे. लुप्त होत जाणाऱ्या ग्रामीण कला व त्या सादर करणाऱ्या कलावंतांना व्यासपीठ मिळावे असाही एक हेतू या जिल्हा महोत्सवामागे असून त्यालाच हरताळ फासला जात असल्याचे या कलावंतांचे म्हणणे आहे.
महोत्सवामुळे त्यांना कार्यक्रमाची संधी मिळणार होती, मात्र संयोजकांनी लावणी व तमाशा यांना बाजूलाच ठेवले असल्याचे महोत्सवाच्या सध्याच्या वेळापत्रकावरून दिसते. लावणीच्या कार्यक्रमांना यशवंतराव चव्हाण सहकार सभागृह दिले जात नाही असे कारण त्यासाठी सांगितले जात आहेत. मात्र कलाकरांना ते मान्य नाही. मध्यंतरी आकाशवाणी ने सादर केलेल्या महोत्सवात लावणीचा कार्यक्रम झाला तो सहकार सभागृहातच झाला. हा महोत्सव सरकारी असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष बाब म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सहकार सभागृह देण्यास सांगितले तर ते सहज मिळेल अशी कलावंतांची भावना असून तीही मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
महापालिकेचे सावेडी क्रिडा संकुल किंवा जॉगिंग पार्क किंवा पाईपलाईन रस्त्यावर नव्याने झालेली काही सभागृह येथेही हे कार्यक्रम होऊ शकतात. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे असे चौरे, पाटेवाडीकर यांचे म्हणणे आहे.