महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांचा २०१२-१६ या कालावधीसाठी वेतनवाढीचा करार दीड वर्षांपासून प्रलंबित असून वेतनवाढीचा करार तत्काळ करून कामगारांना पगारवाढ द्यावी, तसेच कनिष्ठ वेतनश्रेणी कर्मचाऱ्यांना किमान वेतनाव्यतिरिक्त कराराचा फायदा देण्यात यावा, अशी माघणी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेचे अध्यक्ष आ. जयप्रकाश छाजेड यांनी केली आहे.
एसटी कामगारांचे पगार हे शासकीय कर्मचारी व इतर महामंडळ किंवा मंडळातील कर्मचाऱ्यांपेक्षा अत्यंत कमी असून वाढती महागाई आणि मिळणारे अत्यल्प पगार यामुळे कर्मचारी त्रस्त आहेत. त्यातच मागील दीड वर्षांपासून मान्यताप्राप्त कामगार संघटनेच्या नाकर्तेपणामुळे वेतनवाढ करार झालेला नाही. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे व उच्च न्ययाालयाच्या निर्णयानुसार कनिष्ठ वेतनश्रेणीत काम करणाऱ्या ३६,९०४ कर्मचाऱ्यांना एप्रिलपासून पगारवाढ झाली आहे. तसेच २० जुलै २०१० पासून मागील फरकाची रक्कम मिळणार आहे. कनिष्ठ वेतनश्रेणीचा कालावदी पाच वर्षांवरून तीन वर्ष करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी एक एप्रिल २०१२ पासून होणार आहे. त्यामुळे ज्या कर्मचाऱ्यांचे तीन वर्ष एक एप्रिल २०१२ रोजी अथवा त्यानंतर पूर्ण होणार आहेत अशा कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे.
परंतु २००० ते २०१२ या कालावधीत २९ हजार कनिष्ठ वेतनश्रेणी कर्मचाऱ्यांनी पाच वर्ष पूर्ण केले असून एसटी महामंडळााच्या अत्यंत बिकट आर्थिक परिस्थितीत एसटीला फायद्यात आणले आहे. अशा कर्मचाऱ्यांचे या करारात प्रचंड आर्थिक नुकसान होणार असल्याचे आ. छाजेड यांनी म्हटले आहे. मागील करारात २९.५ टक्के झालेल्या नुकसानीची भरपाई करून वेतन निश्चिती करण्याबाबत या करारात डोळे झाक करण्यात आली आहे. त्यामुळे २००० ते २०१२ या कालावधीतील कनिष्ठ वेतनश्रेणी कर्मचाऱ्यांचे नुकसान होणार आहे. या नुकसानीची भरपाई करून वेतन निश्चिती करण्यात यावी, किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन दिलेल्या कर्मचाऱ्यांना किमान वेतनाव्यतिरिक्त कराराचा फायदा देऊन सुधारित कनिष्ठ वेतनश्रेणी लागू करण्यात यावी तसेच कराराची अंमलबजावणी करण्यापूर्वी संकेत स्थळावर आणि आगार पातळीपर्यंत कर्मचाऱ्यांसाठी कराराचा मसुदा प्रसिद्ध करावा, कामगारांची मान्यता घेऊन तत्काळ करार करण्यात यावा, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. या मागण्या मान्य न झाल्यास न्यायालयीन लढाई व प्रखर आंदोलन करण्याचा इशाराही संघटनेचे अध्यक्ष आ. छाजेड यांनी दिला आहे.