अकोला येथील डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाचे विभाजन करून महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री कर्मवीर मा. सा. कन्नमवार यांची कर्मभूमी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्य़ातील मूल येथे त्यांच्या नावाने स्वतंत्र कृषी विद्यापीठ स्थापन करण्याची मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी १७ डिसेंबर रोजी विधानसभेत कृषी विभागाच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेत बोलताना केली.
आमदार मुनगंटीवार म्हणाले, कृषी विद्यापीठाच्या स्थापनेच्या दृष्टीने मूल तालुक्यात सर्व अनुकूल बाबी उपलब्ध आहेत. पूर्व विदर्भात लाखोळी, शिंगाडा उत्पादन, तसेच धानाच्या संदर्भात असणाऱ्या ६८ प्रकारच्या व्हॅल्यू अ‍ॅडिशन प्रकाराचा अभ्यास करून या परिसरातील शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र क्रांती या कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून घडवून आणली जाऊ शकते. विदर्भात शेतीचा जो क्रॉप पॅटर्न आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी पूर्व विदर्भातील धान उत्पादक प्रदेशात हे कृषी विद्यापीठ स्थापन झाल्यास शेतकऱ्यांच्या जीवनात नवे परिवर्तन घडेल. बाळासाहेब थोरात जेव्हा कृषीमंत्री होते त्यावेळी ओरिसा येथील कटकच्या धर्तीवर धान संशोधन केंद्र मूल परिसरात स्थापन करावे, अशी मागणी विधानसभेत केली होती. त्यावेळी बाळासाहेब थोरात यांनी सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासनही दिले आहे.
मूल हा परिसर कर्मवीर कन्नमवार यांची कर्मभूमी आहे. विदर्भाचा भूमीपुत्र म्हणून आपण कर्मवीर कन्नमवारांना ओळखतो. त्यामुळे अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे विभाजन करून या परिसरात स्वतंत्र कृषी विद्यापीठ स्थापन करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने गंभीरतेने विचार करावा, अशी मागणी आमदार मुनगंटीवार यांनी या चर्चेदरम्यान केली. या मागणीचा अभ्यास करण्यासाठी उच्चस्तरीय अभ्यास समिती नेमण्यात येईल व समितीच्या शिफारशीनुसार योग्य कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन या चर्चेच्या उत्तरादरम्यान कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
विदर्भातील दोन भागात असमतोल झाल्याचे निदर्शनास आले आहे. अमरावती आणि नागपूर या दोन्ही विभागातील पीक पद्धती वेगवेगळी आहे. त्या अनुषंगाने या उच्चस्तरीय समितीच्या माध्यमातून अधिकाधिक विकेंद्रीकरण कसे करता येईल, याचा विचार शासन निश्चितपणे करेल, असेही कृषीमंत्री विखे पाटील यावेळी बोलताना म्हणाले.