महावितरण कंपनीमध्ये बाह्य़स्त्रोताद्वारे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम करावे, अशी मागणी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे कार्याध्यक्ष मोहन शर्मा यांनी राज्य शासनाकडे केली आहे.
महावितरण वीज कंपनीमध्ये कनिष्ठ तंत्रज्ञ, कनिष्ठ यंत्रचालक, संगणक परिचालक, लिपिक, शिपाई आदी पदावर दहा हजारांच्या वर बाह्य़स्त्रोत कर्मचारी काम करीत आहेत. हे कर्मचारी गेल्या अनेक वर्षांंपासून महावितरणमध्ये सेवा देत असले तरी कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे काम करीत आहेत. त्यांना फक्त ५ ते ७ हजार रुपये वेतन दिले जाते. त्यांना महागाई भत्ता व अन्य सवलतीही दिल्या जात नाही. त्यांची ज्येष्ठता लक्षात घेता त्यांना महावितरण कंपनीमध्ये शैक्षणिक पात्रतेनुसार कायम स्वरूपी सामावून घ्यावे, मात्र व्यवस्थापनाने त्याचा विचार केला नाही. त्यांना सेवेत सामावून घेण्याची कोणतीही यंत्रणा महावितरण व्यवस्थापनाने तयार केली नसल्याकडेही शर्मा यांनी लक्ष वेधले आहे.
सरळ नोकर भरतीच्या वेळी बाजारपेठेतून अननुभवी उमेदवारांना व्यवस्थापन कायम नोकरी बहाल करते. ज्यांचा अनेक वषार्ंचा अनुभव आहे, जे महावितरणच्या कामकाजात अनुभवाने तरबेज झाले आहेत, त्यांना काही अटी घातल्यामुळे घेतले जात नाही. हा अनुभवी तरुण-तरुणींवर अन्याय आहे. जे अनेक वर्षे महावितरणचे काम बघत आहेत, ते कायम न होता नोकरीबाहेर जातील व त्यांच्या जागी नवीन अननुभवी व शिकाऊ उमेदवार कायम कामगार म्हणून नोकरीवर येतील, ही विसंगती असल्याचे शर्मा यांनी म्हटले आहे. म्हणून राज्य शासनाने या दहा हजार बाह्य़स्त्रोत कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेण्याचे आदेश महावितरण कंपनीला द्यावेत, अशी मागणीही शर्मा यांनी केली आहे.