मोहोळ तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखान्यात झालेल्या आर्थिक नुकसानीप्रकरणी कारखान्याच्या तत्कालीन संचालक मंडळावर ठपका ठेवून त्यांच्याकडून नुकसानीची रक्कम वसुलीची कारवाई हाती घेण्यात आल्याच्या पाश्र्वभूमीवर कारखान्याचे तत्कालीन संचालक तथा पंढरपूरचे माजी आमदार सुधाकर परिचारक यांच्यानंतर मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांचेही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालकपद रद्द व्हावे, अशी मागणी सहकार विभागाकडे करण्यात आली आहे.
भीमा सहकारी साखर कारखान्यात एक कोटी ३२ लाख १५ हजारांच्या नुकसानीसाठी सहकार विभागाने कारखान्याच्या संचालक मंडळास जबाबदार धरून त्यांच्याकडून नुकसानीची रक्कम वसुलीची कारवाई हाती घेतली आहे. या कारखान्याच्या तत्कालीन संचालक मंडळात पंढरपूरचे माजी आमदार सुधाकर परिचारक व मोहोळचे माजी आमदार राजन पाटील-अनगरकर यांचा समावेश होता. हे दोघेही नेते सध्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत संचालकपदावर कार्यरत आहेत. भीमा साखर कारखान्यातील नुकसानीसाठी महाराष्ट्र सहकार कायद्यान्वये जबाबदारी निश्चितीचा आदेश झाल्यास व त्यांच्याविरुद्ध वसुलीप्रमाणपत्र दिले असल्यास ते संचालकपदावर राहण्यास अपात्र ठरतात. त्यामुळे सुधाकर परिचारक यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदासाठी अपात्र ठरविण्यात यावे म्हणून सहकार विभागाकडे परिचारक यांचे विरोधक चंद्रकांत बागल यांनी यापूर्वीच दाद मागितली होती. त्यानंतर आता मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांनाही जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदासाठी अपात्र ठरविण्यात यावे म्हणून भारत विठ्ठल पाटील (रा. पुळूज, ता. पंढरपूर) यांनी पुण्याच्या सहकार विभागाचे सहनिबंधकांकडे धाव घेतली आहे. या प्रकरणात अर्जदार पाटील यांच्या वतीने अ‍ॅड. विनायक नागणे हे काम पाहात आहेत.