शहर काँग्रेस अध्यक्षपदाविरूध्दचा वाद थेट दिल्ली दरबारी गेल्यामुळे या वादावर तोडगा काढण्यासाठी लवकरच या पदावर नवीन अध्यक्ष आरूढ झालेला दिसण्याची चिन्हे आहेत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी अलिकडेच त्यासंदर्भात शहरातील काही मान्यवरांची मते जाणून घेतली असून राज्यातील वर्धा, चंद्रपूर व जळगाव या जिल्हा अध्यक्षांना बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या असतानाच नाशिक शहर अध्यक्षही बदलण्याच्या दृष्टिने प्रयत्न सुरू झाले आहेत.
काँग्रेस शहर अध्यक्षपदी आकाश छाजेड यांची निवड झाल्यापासून त्यांना विरोध करणारा गट सक्रिय झाला. या गटाने अगदी उघडपणे छाजेडांविरूध्द भूमिका घेतल्याने शहरात जणूकाही समांतर काँग्रेसच निर्माण झाली. आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर ही गटबाजी पक्षाला घातक ठरण्याची शक्यता काही निष्ठावान पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांच्या कानी वेळोवेळी घालण्याचे काम केले. आतापर्यंत या गटबाजीकडे गंभीरपणे न पाहणाऱ्या प्रदेशाध्यक्ष व मुख्यमंत्र्यांनी हा प्रश्न कायमचा मिटविण्याच्या दृष्टिने हालचाली सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून काही मान्यवरांना मुंबईत बोलावून प्रत्येकाशी व्यक्तिगत चर्चाही करण्यात आली. परंतु यासंदर्भात निष्ठावान कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची वेगळीच भूमिका पुढे येत असून छाजेड गटाला विरोध करणाऱ्या गटातीलच कुणा एकाला अध्यक्षपदाची संधी दिल्यास गटबाजी कमी होण्याऐवजी कायमच राहील. त्यामुळे नवीन अध्यक्ष निवडताना तो छाजेड गटालाही मान्य राहील, हे बघावे अशी सूचना करण्यात येत आहे. एक-दोन वर्षांपासून छाजेड समर्थक व विरोधक अशा दोन्ही गटांपासून दूर राहून पक्षाची सेवा करणारे काही ज्येष्ठ पदाधिकारी आहेत. गटबाजीमुळे शहरातील काँग्रेसची ढासळती अवस्था पाहून दु:खी होणाऱ्या अशा एखाद्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्याला अध्यक्षपदाची संधी का देण्यात येऊ नये, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दोन्ही गटांना संमत होईल, अशी व्यक्ती या पदासाठी निवडली गेल्यास त्याचा काँग्रेसला लाभ होऊ शकेल आणि गटबाजीही संपुष्टात येऊ शकेल. केवळ मुंबईत बसून काही व्यक्तींशी चर्चा करून याप्रश्नी निर्णय घेऊ नये, अशी अपेक्षा या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. नाशिकमध्ये निरीक्षक पाठवून निष्ठावंत कार्यकर्त्यांचे मन जाणूनच नवीन अध्यक्ष निवडण्यात यावा, अशीही त्यांची भावना आहे.
संग्रहित लेख, दिनांक 18th May 2013 रोजी प्रकाशित
गटबाजीपासून दूर असलेल्यास काँग्रेस शहराध्यक्षपदी संधी देण्याची मागणी
शहर काँग्रेस अध्यक्षपदाविरूध्दचा वाद थेट दिल्ली दरबारी गेल्यामुळे या वादावर तोडगा काढण्यासाठी लवकरच या पदावर नवीन अध्यक्ष आरूढ झालेला दिसण्याची चिन्हे आहेत.
First published on: 18-05-2013 at 12:30 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Demand to give oppoturnity of city head who is away from groupism