कोल्हापूर शहरातील व जिल्ह्य़ातील रुग्णांना वरदायिनी ठरलेल्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील समस्या व रुग्णांच्या गैरसोयीबाबत कोल्हापूरचे शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर, डॉ.आमदार सुजित मिणचेकर यांच्यासह अन्य आमदारांनी नागपूर येथील विधानभवनात निदर्शने केली. रुग्णालयाच्या दुरवस्थेचे वर्णन करणारे फलक हाती घेऊन या आमदारांनी शासनाच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.     
कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय हा शहर व ग्रामीण भागातील रुग्णांचा मोठा आधार आहे. गेल्या काही वर्षांत रुग्णालयातील समस्या वाढीस लागल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. उपचार पद्धतीतील त्रुटी, दलालांची साखळी, बनावट दाखले देणाऱ्या टोळ्या, अनुभवी डॉक्टरांचा अभाव आदी समस्यांनी या रुग्णालयाला ग्रासले आहे. रुग्णालयाचे प्रशासन व शासनाचे दुर्लक्ष झाल्याने गेल्या काही वर्षांपासून या इस्पितळाचे अस्तित्व नामशेष होत चालले आहे. रुग्णांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आज नागपूर येथे शिवसेनेच्या आमदारांनी निदर्शने केली.    
आमदार क्षीरसागर, डॉ.मिणचेकर, संजय सिरसाट, भरत गोगावले, प्रताप सरनाईक, प्रदीप जयस्वाल, राजन विचारे या आमदारांनी विधानभवनाच्या दारात निदर्शने करीत शासनाचे लक्ष वेधले. या आमदारांच्या हातात ‘सीपीआर मोजतेय अंतिम घटका, शासनाचा ऑक्सिजन निघाला फुसका’ अशा आशयाचे फलक इस्पितळाच्या छायाचित्रासह होते. या रुग्णालयाला अत्याधुनिक करण्याचे दिवंगत आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर यांचे स्वप्न पूर्ण होण्याकरिता शासन अजून किती वाट बघायला लावणार, असा प्रश्न उपस्थित करीत आमदार क्षीरसागर यांनी इस्पितळातील गैरसोयीसह कर्मचाऱ्यांचे प्रश्न शासनाने सत्वर सोडवावेत, अशी मागणी केली.
प्रमिलाराजे रुग्णालय आणि छत्रपती राजर्षी शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयात समन्वय घडवून आणावा, असा मुद्दाही त्यांनी मांडला. यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह आरोग्यमंत्री, वैद्यकीय शिक्षणमंत्री, दोन्ही विभागाचे राज्यमंत्री व सचिव यांना निवेदन सादर केले.