महसूल विभागातील कर्मचा-यांचे आंदोलन सुरूच आहे. सोमवारीही या कर्मचा-यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने केली. उद्यापर्यंत मागण्या मान्य न झाल्यास परवा (बुधवार) लेखणी बंद करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. उद्या (मंगळवार) काळ्या फिती लावून काम करणार आहेत.
कारकून व अव्वल कारकून संवर्गातून तहसीलदार पदावर पदोन्नती देण्याचे सूत्र राज्य सरकारने अलीकडेच बदलले आहे. गेल्या दि. ६ ला याबाबतचा आदेश राज्य सरकारने जारी केला. त्याला महसूल कर्मचा-यांचा विरोध असून हा आदेश वर्ग तीनच्या कर्मचा-यांवर अन्याय करणारा आहे. या आदेशाला राज्य सरकारने तातडीने स्थगिती द्यावी या मागणीसाठी गेल्या दि. २४ पासून संघटनेचे आंदोलन सुरू असून, राज्य सरकार हा आदेश मागे घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असे महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब डमाळे यांनी सांगितले. येत्या पंधरा दिवसांतही राज्य सरकारने याबाबतचा निर्णय न घेतल्यास दि. १६ ऑगस्टपासून बेमुदत संपाचा निर्णय राज्य स्तरावर झाल्याचेही डमाळे यांनी सांगितले.
लेखणी बंद आंदोलनामुळे बुधवारी नागरिकांची गैरसोय होणार आसल्याचे मान्य करून त्याबद्दल डमाळे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र राज्य सरकारच्या चुकीच्या आदेशामुळेच कर्मचा-यांवर ही वेळ आल्याचे त्यांनी म्हटले आहे.