महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात शासकीय विश्वस्त समितीने केलेला कोटय़वधी रुपयांचा आर्थिक घोटाळा, अनागोंदी कारभार, गोधनाची कसायांना केलेली विक्री, यांसारखी अनेक प्रकरणे हिंदू विधिज्ञ परिषदेने चव्हाटय़ावर आणूनही शासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या वारकरी आणि हिंदू संघटनांनी आज राज्यातील महत्त्वाच्या २२ शहरांत निदर्शने करत शासनाचा तीव्र शब्दांत निषेध केला.
येथील शिवाजी चौक येथे सकाळी  झालेल्या या निदर्शनांच्या वेळी शासनाने विठ्ठल मंदिर समितीची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, मंदिर समिती बरखास्त करून ती वारकऱ्यांच्या ताब्यात द्यावी. मंदिराच्या सर्व आíथक व्यवहारांचे विशेष लेखापरीक्षण तातडीने करावे. गोधनाची कसायांना विक्री करणाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशा मागण्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या व्यासपीठाखाली एकत्र आलेल्या संघटनांद्वारे करण्यात आल्या.
या वेळी शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले,‘‘पंढरपूरच्या देवस्थान समितीचा भ्रष्टाचार हिंदू जनजागृती समितीने उघड केला. या भ्रष्टाचाराविरुद्ध संघर्ष करत राहण्याची गरज आहे. मंदिरांचा पसा मुस्लिम व ख्रिश्चनांना वाटण्यास हिंदूंनी विरोध करावा असे आवाहन त्यांनी केले. आंदोलनामध्ये इस्कॉनचे जयानंद दास, हिंदू एकताचे प्रांतिक अध्यक्ष दिलीप भिवटे, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बराले, बजरंग दलाचे संभाजी साळुंखे, विश्वहिंदू परिषदेचे सुधीर जोशी यांच्यासह हिंदू जनजागृतीचे कार्यकत्रे, हिंदुत्ववादी लोक उपस्थित होते.