नैसर्गिक आपत्ती आणि अन्य संकट प्रसंगी काय करावे आणि काय करू नये याचे धडे अर्थातच आपत्ती प्रसंगाला कसे सामोरे जावे याची माहिती दृष्टी नसलेल्या अर्थातच अंध मंडळींनाही व्हावी, त्यासाठी ब्रेल अभ्यासक भरत जोशी यांनी ब्रेल लिपीत लिहिलेले ‘आपत्ती व्यवस्थाप’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.
दहशतवाद्यांचा हल्ला, बॉम्बस्फोट, गोळीबार, भूकंप, आग, पूर आदी नैसर्गिक आणि मानवनिर्मित घटनांमध्ये आपत्ती व्यवस्थापन महत्वाचे ठरते. सर्वसामान्यांप्रमाणेच अंध मंडळींनीही यात मागे राहू नयेत आणि अंध व्यक्तींपर्यंत आपत्ती व्यवस्थापनाचे महत्व पोहोचावे या उद्देशाने हे पुस्तक तयार करण्यात आले आहे.
 ब्रेल लिपीचे संस्थापक लुई ब्रेल यांच्या २०४ व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने नुकतेच या पुस्तकाचे प्रकाशन झाले. महाराष्ट्र शासन, सर्पदर्शन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या या पुस्तकाचे मुद्रण नॅशनल असोसिशएन फॉर दि ब्लाईंड (नॅब) ने केले आहे.
पुस्तकात ब्रेल लिपीच्या सहाय्याने एके-४७, एके-५६ रायफली आणि बुलेट्सची माहिती देण्यात आली असून आग म्हणजे काय, आगीवर नियंत्रण कसे मिळवायचे, वादळ, पूर, शाळेच्या बसमधून भूकंप झाला तर काय काळजी घ्यायची, आग, बॉम्बस्फोट अशा घटनांमध्ये काय काळजी घ्यायची, जखमी झालेल्या रुग्णांना उचलण्यापासून ते रुग्णवाहिकेत ठेवण्यापर्यंत काय करायचे आदींची माहिती देण्यात आली आहे.
 सध्या हे पुस्तक मराठी भाषेत म्हणजे मराठी ब्रेल लिपीत आहे. लवकरच हे पुस्तक १८ भारतीय भाषांमध्ये भाषांतरीत केले जाणार आहे.
पुस्तकाचे देणगीमूल्य शंभर रुपये इतके असून महाराष्ट्रातील आणि भारतातील अंध शाळांना हे पुस्तक भेट म्हणून मोफत पाठविले जाणार आहे. अधिक माहितीसाठी भरत जोशी यांच्याशी ९२२१५८०८८८ या क्रमांकावर संपर्क साधावा.