नेपाळमधील भूकंपासारख्या नैसर्गिक तसेच आग किंवा अन्य प्रकारच्या आपत्तीच्या वेळेस नेमके काय करायचे याचे कोणतेही व्यवस्थापन मुंबईतील शाळांमध्ये नाही. त्यामुळे, अशा आपत्तीच्या वेळेस मोठय़ा संख्येने जीवितहानी होण्याची शक्यता संभवते, असे खुद्द प्राचार्य मान्य करीत आहेत. त्यामुळे आता शाळांमध्ये आपत्कालीन व्यवस्थापनाचे धडे गिरविणे गरजेची बाब बनली आहे.
नेपाळच्या आधी कचमध्ये २००६ साली भूकंपाने मोठी जीवित आणि वित्तहानी झाली होती. त्या वेळेस शाळांनी या प्रकारच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या गोष्टीवर लक्ष देण्याच्या बाबीवर चर्चा झाली होती. परंतु, अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या शाळा वगळता मुंबईतील बहुतांश शाळांमध्ये नियोजन तर सोडाच पण साधा विचारही झाला नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
‘यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान’च्या ‘शिक्षण कट्टा’ या शैक्षणिक विषयांवरील चर्चेच्या उपक्रमात या आठवडय़ात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न हा विषय होता. त्यात शाळेचे प्राचार्य ,संस्थाचालक, शिक्षक, मानसोपचारज्ज्ञ, माजी सरकारी अधिकारी, शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्या वेळेस ही बाब प्रकर्षांने समोर आली.
कित्येकदा शाळेत साधी अग्निशमन यंत्रणाही नसते. इतकेच काय तर शाळेचे जिने, कॉरिडॉर इतके अरुंद असतात की मुलांची चेंगराचेंगरी होऊ शकते. काही शाळांमध्ये तर शाळा भरताना किंवा सुटल्यानंतरही चेंगराचेंगरी होण्याची शक्यता असते. पण, या साध्या साध्या बाबींचाही विचार केला जात नाही, असे ‘राजा शिवाजी विद्यालया’च्या मुख्याध्यापिका सुचेता भवाळकर यांनी सांगितले. अर्थात काही शाळा स्वत:हून पुढाकार घेऊन आपत्ती व्यवस्थापनाची योजना कार्यान्वित करतात. मात्र, राज्य सरकारकडून याबाबत काहीच निर्देश दिले जात नाहीत. किंवा शाळांची पाहणीही केली जात नाही, याकडे ‘महात्मा गांधी विद्या मंदिर’चे मानद सचिव मिलिंद चिंदरकर यांनी लक्ष वेधले.
पेशावरच्या शाळेवरील दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांनी शाळांना सावधगिरी म्हणून काय काय उपाययोजना करता येतील, याची यादीच पाठविली होती. मात्र, अनेक शाळांकडे मुलभूत सुविधांचीही कमतरता आहे. काही शाळा तर अशा ठिकाणी वसल्या आहेत की त्यांच्या सभोवताली सुरक्षा भिंत उभारणेही शक्य नाही, याकडे काही प्राचार्यानी लक्ष वेधले.
असेही अपवाद
या सगळ्याला जोगेश्वरीमधील अस्मिता विद्यालय हे अपवाद म्हणायला लागेल. ‘आयएसओ’ मानांकन असलेल्या या शाळेत २०१०सालीच आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने कार्यवाही सुरू करण्यात आली होती. आग किंवा भूकंपासारखे धक्के जाणवले तर अवघ्या पावणेतीन मिनिटांत शाळेचे ७०० ते ८०० विद्यार्थी खालच्या पटांगणावर जमा होतील या दृष्टीने शाळेची तयारी आहे. या प्रकारचे मॉक ड्रिल दर वर्षी दोनदा केले जाते. आयएसओच्या विविध चाचण्यांमध्ये आपत्ती व्यवस्थापन हादेखील एक घटक होता. तेव्हा आम्ही या दृष्टीने शाळेला तयार करण्याची योजना आखली, असे शाळेचे कार्याध्यक्ष जगदीश सामंत सांगतात. यात विद्यार्थी, पालक, शिक्षक, कर्मचारी, संस्थाचालक या सर्वानाच सहभागी करून घेतले जाते. यात प्रत्येकाची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर अशा वेळेस स्वच्छतागृहात कुणी असेल तर त्यालाही बाहेर काढण्याच्या दृष्टीने योजना आखली आहे. मुख्य म्हणजे शाळेने याकरिता कुठल्याही तज्ज्ञाची मदत घेतली नव्हती. प्रत्येक वेळेस मॉक ड्रिलमध्ये झालेल्या चुका, अडचणी यांचा विचार करून योजनेत बदल केले जातात. शिक्षक आणि पालक या दोन्हींचे सहकार्य आम्हाला यात मिळते, अशी पुस्ती सामंत यांनी जोडली. अस्मिता विद्यालयाप्रमाणे आपत्ती व्यवस्थापनाचा विचार करणाऱ्या शाळा मुंबईत मात्र अगदीच थोडय़ा आहेत.