* एनडीएच्या १२३ व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ संपन्न
देशाच्या लष्कर प्रमुखांसमोर छात्रांचे शिस्तबद्ध संचलन.. सुखोई व सुपर डिमोना विमानांची थरारक प्रात्यक्षिके.. छात्रांच्या पालकांकडून होणारे अभिनंदन.. अशा उत्साही वातावरणात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) १२३ व्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ गुरुवारी सकाळी पार पडला.
एनडीएच्या क्वार्टर डेक परेड मैदानावर झालेल्या या दीक्षांत संचलन कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून देशाचे लष्करप्रमुख विक्रम सिंह उपस्थित होते. याप्रसंगी दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख ए. के. सिंग, एनडीएचे कमांन्डंट लेफ्टनन्ट जनरल अशोक सिंग, व्हाईस कमांडन्ट रीअर अॅडमिरल आनंद लेयर यावेळी उपस्थित होते. या संचलनाचे नेतृत्व यश सावलकर या छात्राने केले. १२३ व्या तुकडीमध्ये सुवर्णपदक भोजपाल शाक्य, रौप्यपदक आदित्य कोहळे आणि कांस्यपदक ए. चंन्डेल यांना बिक्रम सिंग यांच्या प्रदान करण्यात आले.
१२३ व्या तुकडीमध्ये अफगाणास्तिनचे पाच आणि भूतानचे तीन, कझाकिस्तानचा एक अशा एकूण ३१८ छात्रांना पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये २१५ जण भूदलात तर ४३ नाविक, ६० वायू दलाचे आहेत. या सर्व छात्रांनी शिस्तबद्धपध्दतीने संचलन करून लष्करप्रमुखांना सलामी दिली. त्यावेळी छात्रांचे उपस्थित असलेल्या पालकांच्या चेहऱ्यावर आनंद व अभिमान झळकत होता. छात्रांचे संचलन सुरू असताना सुखोई, लढाऊ हेलिकॉप्टर व सुपर डिमोना या विमानांनी सलामी देत सर्वाचे लक्ष वेधून घेतले. यावेळी छात्रांना मार्गदर्शन करताना बिक्रम सिंग म्हणाले की, ४१ वर्षांपूर्वी तुम्ही ज्या ठिकाणी संचलन करत आहात, त्या ठिकाणीच मी सुद्धा संचलन केले आहे. गेल्या तीन वर्षांत एनडीएमध्ये तुम्हाला दिलेल्या प्रशिक्षणादरम्यान अनेक मूल्य शिकवली आहेत. त्यांचा आदर राखत तुमचे कर्तव्य धैर्याने बजावले पाहिजे.