कर्जदारांच्या छायाचित्रांसह जामीनदारांची नावे प्रसिद्ध करून स्टेट बँकेने अवलंबलेल्या पद्धतीने कारवाई सुरू करण्याच्या मुद्दय़ावर जिल्हा शासकीय सहकार कृती समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.
नाशिक जिल्हा शासकीय कृती समितीची बैठक प्रथम जिल्हा उपनिबंधकांच्या उपस्थितीत व नंतर जिल्हाधिकारी विलास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीत केवळ चर्चा होऊन निर्णयांवर ठोस अंमलबजावणी होत नसेल तर या बैठकांचा उपयोग काय, असा उद्वेग अशासकीय सदस्यांनी यावेळी व्यक्त केला.
जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधकांनी तातडीची काही शासकीय कामे असल्याने ही बैठक तहकूब करून या महिन्यातच पुन्हा बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले. अल्पवेळ झालेल्या या बैठकीत अग्रसेन पतसंस्थेतील फायली गहाळ असल्याचे सांगण्यात आले. क्रेडिट कॅपिटल पतसंस्थेचे जळीत प्रकरण व झुलेलाल पतसंस्थेतील बोगस कर्जवाटप या विषयांसह कपालेश्वर पतसंस्थेच्या ठेवी वाटपाबाबत काय करणे शक्य आहे, यावर चर्चा झाली. चर्चेत अशासकीय सदस्य पां. भा. करंजकर, बी. डी. घन, ठेवीदार संघटनेचे डी. एल. कराड, जिल्हा उपनिबंधकांसह पतसंस्था व बँक व्यवस्थापकांनी भाग घेतला.