दूषित पाणी पुरवठय़ामुळे मुंगी (ता. शेवगाव) येथे २० जणांना गॅस्ट्रोची लागण झाली. त्यांना उपचारासाठी शेवगाव व पैठण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान जिल्ह्य़ातील डेंगीच्या रुग्णांची संख्याही दुपटीने वाढून ४० वर गेली आहे. साथ रोग नियंत्रणातील आरोग्य, ग्रामपंचायत व पाणीपुरवठा या तीन विभागाच्या यंत्रणातील समन्वयाअभावी रोगांचा फैलाव जिल्ह्य़ात अधिक वेगाने होण्याची शक्यता आहे.
मुंगी गावात काल गॅस्ट्रोचा प्रादुर्भाव आढळून आला. २० जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. कारभारी खरात यांच्या पथकाने भेट दिली. पाणीपुरवठय़ातील शुद्धीकरणाअभावी लागण झाल्याचे त्यांनी सांगितले. आरोग्य समितीच्या सभापती तथा जि. प. उपाध्यक्ष मोनिका राजळे यांच्या माहितीनुसार गावच्या पाणीपुरवठा योजनेतील टाकी उघडी आहे, त्याची स्वच्छता केली जात नाही. आरोग्य समितीच्या आज झालेल्या सभेत सदस्यांनी गावांना पाणीपुरवठा करणा-या टँकरच्या पाण्याच्या शुद्धीकरणाकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार केली.
दरम्यान, डेंगीच्या जिल्ह्य़ातील रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. नगर शहरासह जिल्ह्य़ात ४० रुग्ण आढळले. ही संख्या जून महिन्यातील संख्येपेक्षा दुप्पट आहे. मात्र त्यात नगर शहरातील रुग्णांची संख्या २२ तर ग्रामीण भागातील संख्या १८ आहे. ग्रामीण भागातील अनेक रुग्ण उपचारासाठी नगरमध्येही येत आहेत.
आरोग्य विभागाच्या म्हणन्यानुसार साथ रोगासाठी प्रतिबंधात्मक उपाय करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत विभागाची आहे. आरोग्य विभाग त्यासाठी केवळ कर्मचा-यांना प्रशिक्षण देते. मात्र मुंगी येथील घटनेत दूषित पाण्यातून लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पाणीपुरवठय़ाकडे लक्ष देण्यासाठी ग्रामपंचायतींनी  जलसुरक्षक नियुक्त केले आहेत. तरीही दूषित पाणीपुरवठय़ातून साथीच्या रोगांची लागण होतेच आहे.
पावसाळ्यात डास प्रतिबंधासाठी धूरफवारणी होणे आवश्यक आहे. आरोग्य विभागाच्या मतानुसार ही फवारणी ग्रामपंचायतींनी करायची आहे. जिल्ह्य़ात किती ग्रामपंचायतींकडे धूरफवारणी यंत्र आहेत याची आकडेवारी विभागाकडे नाही. काही ग्रामपंचायतींनी १२ व्या वित्त आयोगातून यंत्रे घेतली ती अनेक ठिकाणी आता सुस्थितीत नाहीत, अशी माहिती अधिका-यांनीच आरोग्य समितीच्या सभेत दिली. काही वर्षांपूर्वी शिर्डीच्या साईबाबा संस्थानने जि. प.ला यंत्रे दिली होती. ती आज कोठे आहेत, याचीही माहिती कोणत्याही विभागाकडे नाही. धूर फवारणीसाठी ‘पायरेथ्रम’ औषधाची आवश्यकता आहे, ते खरेदी करण्यासाठी ग्रामपंचायतींकडे निधी नाही. त्यामुळे जिल्हा नियोजन मंडळाने प्राथमिक आरोग्य केंद्रांना धूरफवारणी यंत्रांसाठी निधी द्यावा, अशी मागणी करणारा ठराव आज सभेत करण्यात आला.
आरोग्य, ग्रामपंचायत व पाणीपुरवठा विभाग पावसाळ्यात साथ नियंत्रणासाठी परस्परांवर जबाबदारी ढकलत केवळ एकमेकांना सूचना देत आहे.