नवीन वर्षांच्या सुरुवातीलाच चोरटय़ांनी छोटय़ा चो-यांसह जबरी चोऱ्या करत दहशत निर्माण केली आहे. परळीत पत्रकाराचे घर फोडून साडेचार लाखाचा ऐवज लांबवल्याची घटना ताजी असतानाच सोन्याचे व्यापारी वाकेकर यांच्या घरातून ३२ लाखांचा ऐवज पळवला. बीड शहरातील सोमेश्वर मंदिरातील तिजोरीही फोडण्यात आली. इतर ठिकाणीही चोरीच्या घटना सुरूच असल्याने पोलिसांच्या गाफीलपणाबाबत नाराजी व्यक्त होत आहे.
बीड जिल्हय़ात नव्या वर्षांच्या सुरुवातीलाच गेवराईसह चौसाळा, परळी, बीड या ठिकाणी झालेल्या चो-यांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेवराईत एकाच रात्री एकाच पद्धतीने पाच ते सहा दुकाने फोडण्याचा प्रयत्न झाला. चौसाळय़ातही एकाच वेळी ७ ते ८ घरांच्या कडय़ा लावून चोरी करण्याचा प्रयत्न चोरटय़ांनी केला. त्यानंतर परळीत एका पत्रकाराच्या घरातून साडेचार लाखांचा ऐवज लुटला. या घटनेला आठवडा होत नाही तोच परळीतीलच टेलर लाईन गल्लीतील वाकेकर या व्यापाऱ्याच्या घरातून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा ३२ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज लुटला. बीड शहरात बार्शी रोडवर असलेल्या सोमेश्वर मंदिराची दानपेटी फोडून चोरटय़ांनी सात हजारांची रोकड लंपास केली. एकूणच या वाढत्या चो-यांचे सत्र रोखण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. स्वत: पोलीस अधीक्षक परळीत ठाण मांडून होते. चोरांच्या शोधासाठी ६ पथके रवाना करण्यात आली आहेत. ग्रामीण भागासह शहरी भागात पोलिसांच्या गस्तीचे प्रमाण कमी झाल्याने चोरटय़ांचे फावत आहे. यासाठी गस्त वाढविणे आवश्यक असल्याची मागणी जनतेतून होत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 20th Jan 2014 रोजी प्रकाशित
पोलिसांच्या गाफीलपणाबाबत नाराजी
नवीन वर्षांच्या सुरुवातीलाच चोरटय़ांनी छोटय़ा चो-यांसह जबरी चोऱ्या करत दहशत निर्माण केली आहे. परळीत पत्रकाराचे घर फोडून साडेचार लाखाचा ऐवज लांबवल्याची घटना ताजी असतानाच सोन्याचे व्यापारी वाकेकर यांच्या घरातून ३२ लाखांचा ऐवज पळवला.

First published on: 20-01-2014 at 02:20 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Displeasure about police incautiously