जिल्हा परिषदेच्या वतीने काढण्यात आलेल्या बालहक्क यात्रेवर होणाऱ्या उधळपट्टीबाबत अनेक जि. प. सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. ज्याचा कोणताही आदर्श नाही, अशा व्यक्तींच्या हातात हा सर्व उपक्रम सोपवून प्रशासनाने काय साध्य केले? असा सवाल सदस्यांनी केला.
जि. प.च्या वतीने बालकांच्या मोफत व सक्तीच्या कायद्याची जनजागृती व्हावी, या साठी ३ ते २६ जानेवारी या कालावधीत यात्रा काढण्याचे निश्चित झाले. सध्या या यात्रेचा प्रवास जिल्ह्य़ात सुरू आहे. १६ तालुक्यांतल्या ५०० गावांत ही यात्रा कलापथकाद्वारे जनजागृती करीत आहे. यात्रेमागचा उद्देश चांगला असला, तरी ज्यांच्याकडे याचे नियोजन दिले आहे, त्यांच्याकडे कोणताही आदर्श नाही. लोहा तालुक्यातील झरी येथील माधवराव पाटील झरीकर यांच्या संस्थेला यात्रेच्या नियोजनाची जबाबदारी दिली आहे. त्यासाठी तब्बल ३४ लाखांची तरतूद आहे. स्वत: झरीकर यांना पोलिसांनी जुगार खेळताना रंगेहाथ पकडले होते. शिवाय त्यांच्याविरुद्ध गुन्ह्य़ांची नोंद आहे. ते ज्या गावचे आहेत त्या झरी येथील ग्रामपंचायतीने यात्रेचे प्रमुख करण्याबाबत आक्षेप नोंदवला होता. यात्रेत झरीकर व त्यांचे पथक प्रबोधन करणार असले तरी ज्यांच्याकडे कोणताही आदर्श नाही, ते विद्यार्थ्यांचे काय प्रबोधन करणार, असा सवाल जिल्ह्य़ातील शिक्षणतज्ज्ञ करू लागले आहेत. बालहक्क यात्रेने कायद्याची जनजागृती होणार असली तरी जनजागृती करणारे किती तज्ज्ञ आहेत, याचा विचार कोणीही केला नाही.
यात्रेचा जिल्ह्य़ातला प्रवास किती होणार? त्यासाठी किती वाहने वापरली? किती मनुष्यबळांचा वापर झाला, याचे उत्तर प्रशासनाकडे नाही. पण यात्रेसाठी सर्वशिक्षा अभियानातून ३४ लाखांची उधळपट्टी होणार असल्याने अनेक सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. प्रत्येक गावात तज्ज्ञ विधिज्ञांना पाठवून या कायद्याची माहिती दिली असती तर ते अधिक सयुक्तिक ठरले असते, अशी प्रतिक्रिया एका सदस्याने नोंदवली. सर्वशिक्षा अभियानातून होणाऱ्या खर्चाची चौकशी करावी, अशी मागणीही पुढे आली आहे. दरम्यान, यात्रेवर ३४ लाखांची उधळपट्टी होणार असल्याची बाब काही सदस्यांच्या जिव्हारी लागली असून, उद्या (बुधवारी) होणाऱ्या सर्वसाधारण सभेत या विषयावर काही सदस्य आक्रमक होतील, असे मानले जाते.