नगर जिल्हा तालीम संघाने पुढील वर्षीपर्यंत कुस्तीचे आधुनिक प्रशिक्षण केंद्र सुरु न केल्यास तालीम संघ बरखास्त केला जाईल, असा इशारा राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी आज पत्रकार परिषदेत दिला. नगरमधील कुस्तीचे चित्र वर्षांत बदलू, असेही आश्वासन त्यांनी दिले.
वाडिया पार्क जिल्हा क्रीडा संकुलात १० ते १४ जानेवारी दरम्यान राज्य सरकारच्या स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याची माहिती देताना लांडगे यांनी हा इशारा दिला. यावेळी युवा नेते विक्रमसिंह पाचपुते, क्रीडा उपसंचालक आनंद व्यंकेश्वर, जिल्हा क्रीडाधिकारी अनिल चोरमले, जिल्हा संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे उपस्थित होते. राज्य सरकारने जिल्हा तालीम संघास मॅट देऊनही त्याचा उपयोग केला जात नसल्याचे यावेळी स्पष्ट झाले.
संकुल उभारताना तेथील कुस्ती स्पर्धेचा आखाडा पाडला गेला, पर्यायी आखाडय़ासाठी जिल्हा संघ पाठपुरावा करत नसल्याचा मुद्दा यावेळी उपस्थित करण्यात आला, त्यावेळी लांडगे यांनी प्रत्येक संघास प्रशिक्षण केंद्र सुरु करण्याची सूचना केली आहे, नगर संघाने पुढील वर्षांपर्यंत आधुनिक केंद्र सुरु करावे, अन्यथा संघ बरखास्त करु असे सांगून लांडगे म्हणाले की, नगर संघाचे अध्यक्ष वैभव वयाने छोटा आहे, तरीही त्याला आपण मार्गदर्शन करत आहोत, पुढील वर्षीपर्यंत जिल्ह्य़ाचे चित्र बदलले असेल. राज्य सरकारने दरवर्षी दोन जिल्ह्य़ास कुस्ती व कबड्डीसाठी मॅट देण्याची योजना सन २००६ पासून सुरु केली आहे, आतापर्यंत १७ जिल्ह्य़ांना त्याचा लाभ झाल्याचे त्यांनी सांगितले.
राज्य कुस्तगीर परिषदेने ऑलिंपिंक स्पर्धेत महाराष्ट्रातील मल्लांचा सहभाग वाढावा व पदके मिळावीत यासाठी ‘मिशन-२०१६’ योजना सुरु केली आहे, त्याअंतर्गत १४, १६, १८ वयोगटातील मल्ल निवडण्यासाठी समिती नेमली आहे, त्याची दत्तक आखाडा योजनेची माहिती त्यांनी दिली.
यावेळी पाचपुते यांनी स्पर्धेच्या आयोजनासंदर्भात माहिती दिली.
तरण तलावाचे उद्घाटन पुन्हा लांबले
कुस्ती स्पर्धेदरम्यान दि. ११ रोजी संकुलातील जलतरण तलावाचे उद्घाटन करण्याचे पालकमंत्री बबनराव पाचपुते यांनी तीन आठवडय़ांपूर्वीच जाहीर केले होते, त्यासाठी त्यांनी तातडीने तलावाचे काम पूर्ण करण्याचे आदेश क्रीडा खाते व ठेकेदारास दिले होते. त्यामुळे तलावाचे काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आले होते. तोपर्यंत काम पूर्ण होऊ शकत नसल्याने उद्घाटन बारगळले आहे, उपसंचालक व्यंकेश्वर व विक्रमसिंह पाचपुते यांनी हे स्पष्ट केले. याकामासाठी अजूनही किमान महिना लागेल, असे जिल्हा क्रीडाधिकारी चोरमले यांनी सांगितले.