दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर, मामाच्या गावाला जाऊया. असे म्हणणाऱ्या बच्चे कंपनीसह नोकरदार व प्रवाशांच्या गर्दीने महामार्ग, ठक्कर बाजार व जुने सीबीएस बसस्थानक अक्षरश: ‘हाऊस फुल्ल’ झाले असून जागा पकडण्यासाठी एकच झुंबड उडाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. गावी जाण्यास निघालेल्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन एस. टी. महामंडळाने ‘कसमादे’, पुणे व उत्तर महाराष्ट्रात जाण्यासाठी जादा बसेस सोडल्या आहेत. तसेच नजीकच्या ठिकाणी जाण्यासाठी बसेसच्या फे ऱ्याही वाढविण्यात आल्या आहेत. पाडवा व भाऊबीजच्या पाश्र्वभूमीवर, प्रत्येक बस स्थानकातून साधारणत: २० ते २५ जादा बसेस सोडण्यात आल्याची माहिती विभाग नियंत्रक के. बी. देशमुख यांनी दिली. प्रवाशांच्या गर्दीमुळे एस. टी. महामंडळाची खऱ्या अर्थाने दिवाळी झाल्याचे चित्र आहे.
शाळांना दिवाळीच्या सुट्टया लागल्यावर गावांकडे जाणाऱ्यांची आवड साऱ्यांनाच असते. विशेषत: दिवाळीनिमित्त पुणे, धुळे, नंदुरबार, जळगांव आदी ठिकाणी जाणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. शनिवारपासून दिवाळीची सुरूवात झाल्याने आपसूक बच्चेकंपनीसह नोकरदारांची पाऊले गावाकडे वळली. पहिल्याच दिवशी गर्दीचा अंदाज न आल्याने परिवहन महामंडळाचे नियोजन कोलमडले. त्यातच शनिवार, रविवारसह काही सुट्टीचे दिवस जोडून आल्याने अनेकांनी बाहेरगावी किंवा पर्यटनास जाण्याचे बेत आखल्याने गर्दीत अधिकच भर पडली. लक्ष्मी पूजन झाल्यावर गर्दीत अधिकच वाढ झाली. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून विभाग नियंत्रकांसह अधिकाऱ्यांनी बस स्थानकात ठाण मांडल्याने उत्सव काळात बसेसचे नियोजन योग्य पद्धतीने करणे शक्य झाल्याचा दावा केला जात आहे.
गावाकडे न जाता पर्यटनाच्यादृष्टीने अनेकांनी पुणे, कोकण, मुंबई यासह उत्तर महाराष्ट्रातील काही ठिकाणांना पसंती दिल्याने जादा बसेसचे खास नियोजन महामंडळाने केले आहे. या शिवाय, अनेकांनी सुट्टीतील बेत आधीच आखल्याने काही वेळा ‘बुकींग’साठी अडचणी येत आहे. ‘ऑनलाईन बुकींग’मुळे काही ठिकाणी तिकीटे संपल्याचे कारण पुढे केले जात असल्याने प्रवासी व कर्मचारी यांच्यात खटके उडत आहेत. स्थानकावर बस आल्यानंतर प्रवासी जागा पकडण्यासाठी खिडकी, मागील दरवाजा अशा सर्व मार्गाचा अवलंब करत आहेत. लहान मुलांना खिडकीतून आत पाठविणे, सामान टाकून जागा पकडण्याच्या या प्रकारांनी स्थानकांवर गोंधळाचे वातावरण दिसत आहे. जागा पकडण्यावरून वाद-विवाद होत असून ते सोडविणे आपले कर्तव्य नाही, अशीच जणू एस. टी. महामंडळाची भावना आहे. दरम्यान, महामंडळाच्यावतीने प्रवाशांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी जादा बसेस सोडण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्याने पुणे, धुळे, कळवण, सटाणा, जळगाव, नंदुरबार ठिकाणी दिवसाकाठी २० ते २५ जादा बसेस सोडण्यात आल्याची माहिती देशमुख यांनी दिली.
संग्रहित लेख, दिनांक 16th Nov 2012 रोजी प्रकाशित
झुंबड..!
दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर, मामाच्या गावाला जाऊया. असे म्हणणाऱ्या बच्चे कंपनीसह नोकरदार व प्रवाशांच्या गर्दीने महामार्ग, ठक्कर बाजार व जुने सीबीएस बसस्थानक अक्षरश: ‘हाऊस फुल्ल’ झाले असून जागा पकडण्यासाठी एकच झुंबड उडाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

First published on: 16-11-2012 at 07:08 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diwali festval feature zumbad