इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांच्या पेपर तपासणीवर बहिष्काराची शिक्षक, प्राध्यापक संघटनांची भुमिका चुकीची आहे. आधीच प्रचंड मानसिक त्रास सहन केलेल्या दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना आता कोणीही वेठीस धरु नये असे आवाहन छात्रभारती या विद्यार्थी संघटनेने केले आहे. काही शिक्षक प्राध्यापक संघटनांनी त्यांच्या मागण्यांसाठी पेपर तपासणीच्या कामावर बहिष्कार घालण्याची भुमिका घेतली आहे. आधीच वर्षभर या ना त्या कारणांनी दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. अनेकवेळा परीक्षेचे वेळापत्रक बदलले, त्यामुळे विद्यार्थी मानसिक तणावाखाली आहेत. अशा पाश्र्वभुमीवर पेपर तपासणीवर बहिष्कार घालण्याची भाषा विद्यार्थ्यांच्या पालकांच्या सहनशीलतेचा अंत पाहणारी आहे. पेपर तपासणी वेळेत झाली नाही तर विद्यार्थ्यांचे पुढील शैक्षणिक वेळापत्रक अडचणीत येणार आहे. शिक्षक प्राध्यापकांच्या मागण्या न्याय्य असल्या तरी त्यांनी विद्यार्थ्यांना वेठीस न धरता शासनाबरोबर वेगळ्या मार्गाने संघर्ष करावा, छात्रभारती त्यांना साथ देईल परंतु विद्यार्थ्यांना वेठीस धरणे थांबवावे असे आवाहन छात्रभारतीचे जिल्हाध्यक्ष रशीद मनियार, दत्ता ढगे, केदार भोपे, प्रविण शिंदे, सोनाली बनसोडे, राणी पावसे, नाजुका ठुबे, प्रियंका सातपुते आदींनी एका पत्रकाद्वारे केले आहे.