रिझर्व बँकेने रूपी बँकेवर घातलेल्या आर्थिक र्निबधांमुळे उद्योजकांबरोबरच सामान्य खातेदारांची अडचण झाली असून, ज्या खातेदारांचा गैरव्यवहाराशी संबंध नाही, त्यांचे व्यवहार सुरळीत व्हावेत यासाठी ‘शिवसेना उद्योग व सहकार आघाडी’तर्फे अनेक मागण्या सोमवारी पत्रकार परिषदेत करण्यात आल्या.
बँकेच्या दिवाळखोरीचे परिणाम खातेदारांना भोगावे लागू नयेत यासाठी या संघटनेने सहकार आयुक्तांकडे काही मागण्या केल्या आहेत. निव्वळ चालू खाते व्यवहार करणाऱ्या खातेदारांचा व लघु उद्योजकांचा बँक व्यवहार पुर्ववत करावा आणि भरणा व रक्कम काढण्यावरील र्निबध शिथील करावेत, उद्योजकांनी २५ लाखांपर्यंत मुदत कर्ज, प्रकल्प कर्ज तारण पद्धतीने घेऊन अटींची पूर्तता केली आहे, त्या उद्योजकांच्या खाते वापरावरील र्निबध शिथील करावेत, ज्येष्ठ नागरिकांच्या ठेवींवरील मासिक व्याज परताव्यावरील र्निबध शिथील करावेत, अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.  दिवाळखोरीस जबाबदार असणाऱ्या संचालकांवर गुन्हा दाखल करावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. तसेच रूपी बँकेच्या खातेदारांनी हर्षद नेगिनहाळ (९९२२७३८१७४), शैलेंद्र लेले (९८२२०९०२५४), अ‍ॅड. राहुल वैद्य (९८२२६३४०२४) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.