सत्काराने जबाबदारी वाढत असते, कारण सत्कार करताना टाळ्या वाजवणारे, हार टाकणारे, निवडणुकीत मते देणारे व मते न देणारे या सर्वाच्या अपेक्षा वाढलेल्या असतात. यासाठी लोकप्रतिनिधींनी पदाचा काटेरी मुकुट परिधान करून जनसेवेचे व्रत पत्करले पाहिजे, असे प्रतिपादन आमदार देवेंद्र फडणवीस यांनी केले.
नवेगावबांध येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आयोजित अर्जुनी-मोरगाव विधानसभा मतदार संघातील सर्व नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार सोहळ्यात ते उद्घाटक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेतराम कटरे होते. स्वागताध्यक्ष म्हणून आमदार राजकुमार बडोले, तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार दयाराम कापगते, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विनोद अग्रवाल, कृषी व पशुसंवर्धन सभापती उमाकांत ढेंगे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काशिम जमा कुरैशी, उपसभापती प्रमोद लांजेवार, अर्जुनीमोर पंचायत समिती सभापती वर्षां घोरपडे, उपसभापती तानेश ताराम आदी उपस्थित होते. यावेळी आमदार फडणवीस म्हणाले, पंचायत राजची संकल्पना भारतात फार जुनीच आहे. हडप्पा व मोहेंजोदडोच्या उत्खननातही विकासात्मक नियोजनाचे पुरावे दिसून येतात. म्हणून पंचायत राज ही संकल्पना या देशात रुजलेली संकल्पना आहे. ती ग्रामविकासाचा पाया आहे. लोकप्रतिनिधींनी आपले अधिकार समजून घेतले पाहिजेत. तेव्हाच ते इतरांचे अधिकार मिळवून देऊ शकतात. लोकप्रतिनिधींच्या अधिकाराला कर्तव्याचीही झालर असली पाहिजे. आधुनिक काळात शहराच्या तुलनेने विकासात्मक प्रक्रियेने आपली गावे मागे जात आहेत, कारण लोकांपर्यंत विकासात्मक कार्यक्रम पोहोचवण्याच्या प्रक्रियेत अनेक छिद्र आहेत. दरम्यान, ग्रामपंचायतचे कार्य, अधिकार, येणाऱ्या समस्या व त्यावरील उपाय याविषयी मान्यवरांनी मार्गदर्शनकेले. अर्जुनी मोर. तालुक्यातील ४१ ग्रामपंचायती, सडक अर्जुनी तालुक्यातील ४४ ग्रामपंचायती व गोरेगाव तालुक्यातील १८ ग्रामपंचायतीमधील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचा स्मृतिचिन्ह, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक स्वागताध्यक्ष आमदार राजकुमार बडोले यांनी, तर संचालन किशोर शंभरकर यांनी केले. आभार पंचायत समिती सदस्य महादेव बोरकर यांनी मानले.