काही चुका झाल्या असतील मात्र त्यामुळे पूर्ण सहकारी चळवळीला बदनाम केले जाऊ नये. कारण सहकार म्हणजे केवळ संस्था नव्हे, तर ती एक चळवळ आहे, असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे-पाटील यांनी केले. सहकारातून मोठय़ा झालेल्या मंडळींकडूनच खासगी कारखाने काढणे हे राज्याचे दुर्दैव आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
इंडियन सोसायटी फॉर स्टडीज इन को-ऑपरेशनच्या राष्ट्रीय वार्षिक परिषदेचे उद्घाटन विखे-पाटील यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. नॅशनल को-ऑपरेटिव्ह युनियन ऑफ इंडियाचे अध्यक्ष जी. एच. अमिन, महासंचालक डॉ. दिनेश, संस्थेचे अनिल करंजकर, डॉ. ए. पी. कन्सल, डॉ. व्ही. बी. जुगले, एस. बी. राव आदी त्या वेळी उपस्थित होते.
विखे पाटील म्हणाले, सहकार चळवळ सध्या मोठय़ा अडचणीतून जात आहे. सहकारी चळवळ राजकारणाने भरली आहे. त्यामुळे ही चळवळ राजकारणाशी जोडली गेली आहे. या चळवळीतून पैसा मिळविणे हा उद्देश नसतो. सहकाराचे अर्थशास्त्र वेगळे असते. संस्थेचा विस्तार व संस्था चालेल इतकाच पैसा त्यातून उपेक्षित असतो. त्यामुळे आर्थिक सुधारणांसाठी ही चळवळ गरजेची आहे. काही ठिकाणी चुकीची कामे झाली असतील मात्र त्यामुळे या चळवळीला बदनाम करणे योग्य नाही. सहकारी चळवळच खऱ्या अर्थाने समाजहीत साधू शकते. त्यामुळे या चळवळीला शक्ती दिली पाहिजे. अमिन म्हणाले की, सहकारात राजकारण वाढले ही बाब खरी आहे. त्यातून या चळवळीला वेगळे वळण लागले. देशात सहकारी संस्थांच्या निवडणुकाच झाल्या नाहीत.