डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील शंभर उत्तरपत्रिका गहाळ प्रकरणात येथील परीक्षा विभागावर संशयाची सुई केंद्रित झाली आहे, तर गहाळ झालेल्या उत्तरपत्रिका शोधण्याची मोहीम युध्दस्तरावर राबविण्यात येत आहे. उत्तरपत्रिका सापडल्यास या सर्व प्रकरणात विद्यापीठाची बाजू सावरली जाण्याची शक्यता आहे. अन्यथा, विद्यापीठाच्या इतिहासातील ही पहिला घटना राज्यात चांगलीच गाजल्याशिवाय राहणार नाही. दरम्यान, या संदर्भात विद्यापीठाची भूमिका जाणून घेण्यासाठी कुलसचिव ज्ञानेश्वर भारती यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी भाष्य करणे शक्य नसल्याचे सांगत संवाद थांबविला.
डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील शंभर उत्तरपत्रिका गहाळ प्रकरणात विद्यापीठाने कसून शोधमोहीम सुरू केली आहे. विद्यापीठातील ढिसाळ कारभारामुळे या उत्तरपत्रिका गहाळ झाल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. उत्तरपत्रिका अत्यंत महत्वाच्या असतात. त्यांची वाहतूक न करता विद्यापीठातच त्या तपासण्याची सोय करण्याची गरज आता व्यक्त केली जात आहे. या सर्व प्रकरणात उपकुलसचिव (परीक्षा) यांच्या ढिसाळ नियोजनाबद्दल विद्यापीठात जोरदार चर्चा सुरू आहे. केवळ गठ्ठे मोजून देण्याची पध्दत आहे. स्वतंत्रपणे उत्तरपत्रिका मोजून देण्याची पध्दत नसल्याची माहिती मिळाली. या ढिसाळ नियोजनामुळेच विद्यापीठातील उत्तरपत्रिका कुठे गेल्या, असा प्रश्न उपस्थित होतो. परीक्षा विभागातील कर्मचाऱ्यांनी गठ्ठे मोजले पण, उत्तरपत्रिका मोजल्या नाहीत, अशी नवी माहिती समोर आली. त्यामुळे उत्तरपत्रिका नेमक्या कुठे गहाळ झाल्या, याचा शोध लावणे आता कठीण झाले आहे. या सर्व प्रकरणात विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या उपकुलसचिवांवर हे प्रकरण चांगलेच शेकले जाण्याची शक्यता विद्यापीठात व्यक्त केली जात आहे. या विभागाच्या उपकुलसचिवांनी कर्मचाऱ्यांना उत्तरपत्रिका मोजून देण्याचा आदेश दिला असता तर ही वेळ आली नसती, असे मत जाणकारांनी व्यक्त केले. या सर्व प्रकरणात अकोला येथून उत्तरपत्रिका वाहून नेणारे वाहन चार तास उशिराने नागपूरकडे धावल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ज्या वाहनात या उत्तरपत्रिका नागपूरकडे पाठविण्यात आल्या त्या वाहनाने सायंकाळी नागपूर गाठण्याची गरज असताना ते रात्री पोहोचले. त्यामुळे सुमारे चार ते पाच तास वाहनाचा प्रवास संशय निर्माण करत आहे. दरम्यान, या गहाळ झालेल्या उत्तरपत्रिकांचा शोध परीक्षा विभागात घेण्यात येत आहे. विभागातील कुणाचे कपाट शोध तर, कुणाची कचरा पेटी शोध, असा विविध ठिकाणी या उत्तरपत्रिकांचा शोध सुरू आहे. परीक्षा विभागातील मोठी कचरा पेटी शोधण्याची गरज आता व्यक्त केली जात आहे. अशाच प्रकारची तपासणी व शोधमोहीम नागपूर येथेही सुरू असल्याची माहिती मिळाली. उत्तरपत्रिकांसाठी विशिष्ट लॉकर किंवा कस्टडी नसल्याने हा प्रकार झाल्याची माहिती मिळाली. त्यामुळे परीक्षा विभागात नव्याने लॉकर व कस्टडी रूम तयार करण्याची गरज आता व्यक्त केली जात आहे. परीक्षा विभागात वरिष्ठांनी आकस्मिक भेट देण्याची गरज आता व्यक्त केली जात आहे.