डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ.व्यंकट मायंदे यांनी काही रुपयांच्या वैद्यकीय बिलांसाठी थेट विद्यापीठाची फसवणूक केल्याची माहिती मिळाली. या प्रकरणात त्यांनी एका नव्हे, तर अनेक दौऱ्यात अकोल्यात हनुमान उडय़ा घेत येथे उपचार केल्याचे उघड झाले. या सर्व प्रकरणात विद्यापीठाची आर्थिक लूट झाल्याचा प्रत्यय येतो. या प्रकरणांची राज्य शासनाने चौकशी करण्याची तसेच विद्यापीठाची जाणीवपूर्वक आर्थिक फसवणूक झाल्याने फौजदारी कायद्यान्वये त्यांच्यावर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
कृषी विद्यापीठाचे कुलगुरू विविध ठिकाणी दौरा करतात. या दौऱ्यात संपूर्ण देशात त्यांची भ्रमंती होते. अशाच काही प्रकरणात कृषी विद्यापीठाचे तत्कालिन कुलगुरू डॉ.व्यंकट मायंदे यांनी दौऱ्यावर असताना थेट अकोल्यात वैद्यकीय तपासणी केल्याचे उघड झाले. जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय तपासणीनंतर त्याच दिवशी अकोल्यातील मेडिकल स्टोअरमध्ये त्यांनी औषध विकत घेतले.
डॉ. व्यंकट मायंदे ८ डिसेंबर २००९ रोजी कर्नाल येथून नवी दिल्लीला गेले व १० डिसेंबर रोजी नवी दिल्ली येथून नागपूरला परतले. या तीन दिवसात त्यांनी मध्येच ९ डिसेंबर रोजी अकोला गाठले व येथील जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून त्याच दिवशी येथील एका खाजगी मेडिकल स्टोअरमध्ये औषध विकत घेतले. या औषधांचे पैसे पेड बाय मी असे त्यांनी सही करत प्रमाणित केले. दौऱ्यावर असताना अकोल्यातील त्यांची वैद्यकीय तपासणी संशय निर्माण करत आहे. माजी कुलगुरू डॉ.मायंदे दौऱ्यावर गेले नसतील तर त्यांच्या दौऱ्याचे देयक बोगस ठरेल. डॉ. मायंदे ७ जून २०१० रोजी विमानाने नवी दिल्लीला कृषी शास्त्रज्ञ नियुक्ती समितीच्या बैठकीसाठी गेले. त्यांनी ९ जून रोजी दिल्ली सोडले, पण ८ जून २०१० रोजी त्यांनी अकोल्यातील जिल्हा रुग्णालयात तपासणी केली. अकोला येथून पुणे येथे कृषी परिषदेच्या विशेष निवड समितीच्या दौऱ्यावर डॉ.मायंदे ८ मार्च २०११ रोजी गेले. विमानाने त्यांनी १० मार्च २०११ रोजी पुणे येथून नागपूर गाठले, पण या मधल्या कालावधीत ९ मार्च २०११ रोजी त्यांनी येथील जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली. रक्तदाब, अ‍ॅसिडिटी व पेनकिलर या गोळ्यांसाठी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू गरिबांसाठी असलेल्या जिल्हा रुग्णालयात कसे काय गेले, असा प्रश्न उपस्थित होतो. त्यांच्या दौऱ्यांमधील वैद्यकीय तपासणी हे विद्यापीठाच्या फसवणुकीचे हिमनगाचे टोक तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित होतो.
नोकरभरती प्रकरणाच्या चौकशी अहवालात गणेश ठाकूर समितीने तत्कालिन कुलगुरूंच्या विरोधात न्यायालयीन व भ्रष्टाचार विरोधातील योग्य प्रकरण असल्याचे स्पष्ट केले होते, तसेच नागपूर येथील अवैध बांधकाम प्रकरणी तत्कालिन कुलगुरू हे विद्यापीठ कायद्यानुसार (कलम १८ (२,४,५ व इतर)) जबाबदार असल्याने त्यांच्यावर अद्याप कारवाई झालेली नाही. शासकीय दौऱ्याच्या दिवशी अकोल्यात पोहोचणे शक्य नसताना येथे जिल्हा रुग्णालयात डॉ.मायंदे यांची वैद्यकीय तपासणी शक्य नाही. याची दखल राज्य शासनाने घेणे गरजेचे आहे. या प्रकरणात कृषी विद्यापीठाची स्पष्टपणे फसवणूक झाल्याचे उघड होते. त्यामुळे विद्यापीठाने या प्रकरणात पोलिसात फौजदारी तक्रार दाखल करण्याची, तसेच या सर्व प्रकरणात राज्यपाल व कृषीमंत्र्यांनी तात्काळ दखल घेऊन कृषी विद्यापीठातील अनागोंदी कारभारावर नियंत्रण मिळवण्याची गरज व्यक्त केली जात आहे.