‘आईना-ए-गझल’ कोषाचे लेखक आणि ज्येष्ठ भूलतज्ज्ञ डॉ. विनय वाईकर यांचे बुधवारी सकाळी अल्प आजाराने निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी डॉ. वीणा, मुलगा अमित, विवाहित कन्या मनीषा, पल्लवी, नातवंडे आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे. आज अंबाझरी घाटावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात
आले.
त्यांनी प्रदीर्घ काळ वैद्यकीय सेवेत घालविला. भारतीय लष्कराच्या वैद्यक सेवेत ते दहा वर्षे होते. १९६३, ६५ आणि ७१ अशा तीन युद्धांचा अनुभव घेऊन ते मेजर या हुद्यावरून ते निवृत्त झाले. प्रभावी वक्ता, कथाकथनकार व कवी असलेल्या डॉ. वाईकरांच्या युद्धकथा आणि ललित लेखन प्रकाशित झाले आहे. त्यांच्या ‘रक्तरंग’ व ‘फौजी’ या दोन कथासंग्रहातून मानवी भावनांशी संबंधित वेगळे जीवन रसिकांना अनुभवायला मिळाले. मराठीसोबतच हिंदी, उर्दू आणि इंग्रजी भाषांवर प्रभूत्व असणाऱ्या वाईकरांच्या युद्धकथा, दोन अंकी नाटके, विविधांगी विषयांवर लेखनआणि वर्तमानपत्रातील त्याचे ललित लेखन रसिकांना भुरळ पाडणारे ठरले. ‘आईना-ए-गझल’ या कोषाचे ते सहलेखक होते. हा कोष मराठी, हिंदी, उर्दू आणि इंग्रजी भाषेत प्रकशित झाला. या चारही भाषेतील या संदर्भ ग्रंथाचे स्थान समीक्षक आणि संशोधकांनी अधोरेखित केले आहे.
उर्दू गझलांचा इतिहास कथन करणारे गुलिस्तान-ए गझल आणि २७५ उर्दू गझलांचा रसाळ भावानुवाद असलेली आईना-ए- गझल ही ग्रंथसंपदा आहे. कलाम-ए-गालिब हा नवा ग्रंथ नुकताच प्रकाशित झाला. एका मराठी कवीचे उर्दू साहित्यासाठी हे योगदान अनमोल ठरणारे आहे. आईना-ए-गझल या पुस्तकाला राज्य शासनाचा उर्दू अकादमीचा, तर ‘लोखंडी पूल’ या एकांकिकेला विदर्भ साहित्य संघाचा पुरस्कार मिळाला.
‘नाती’ या मराठी मालिकेचे लेखन त्यांनी केले. प्रहार या संघटनेचे संस्थापक सदस्य म्हणून त्यांनी काम केले. हिटलरच्या देशात, मिर्झा गालिब-गझला, ती अवचित येते तेव्हा हे दोन अंकी संगीत नाटक ही त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
 उर्दू आणि मराठी भाषेतील दुवा म्हणून ओळखले जाणारे डॉ. वाईकर मित्र वर्तुळात ‘राजाभाऊ’ या नावाने परिचित होते.