अखिल भारतीय नाटय़ परिषदेच्या अखत्यारितील यशवंत नाटय़ मंदिरात मराठी नाटकांचे भाडे वाढवण्यात यावे, असा प्रस्ताव नाटय़ परिषदेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत मांडण्यात आला आहे. मराठी नाटकांच्या भाडेवाढीच्या प्रस्तावावर चर्चा करताना गुजराती नाटकांसाठीच्या भाडय़ात केलेल्या कपातीकडे मात्र परिषदेने सोयिस्करपणे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. नाटय़ परिषदेच्या या दुटप्पी भूमिकेबाबत अनेक निर्माते नाराज आहेत. नाटय़ परिषदेच्या यशवंत नाटय़ मंदिराचे भाडे आता वाढवावे अशी सूचना कार्यकारिणीच्या बैठकीत नाटय़ मंदिराच्या व्यवस्थापकांनी मांडली. अनेक सदस्यांनी या सूचनेला रूकारही दर्शवला. मात्र मराठी नाटकांसाठी भाडेवाढ करण्याची सूचनावजा प्रस्ताव मांडणाऱ्या या व्यवस्थापकांनी गुजराती नाटकांसाठीचे भाडे तीन हजार रुपयांनी कमी करताना तसा कोणताही प्रस्ताव परिषदेसमोर मांडला नाही, असे कार्यकारिणीतील एका सदस्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.
याबाबत काही मराठी नाटय़ निर्मात्यांशी बोलले असता त्यांनीही यशवंत नाटय़ मंदिराच्या व्यवस्थापनाबाबत नाराजी व्यक्त केली. या नाटय़ मंदिराचे व्यवस्थापन मराठी नाटकांना नेहमीच सापत्न वागणूक देत असते. मराठी नाटकांचा एक एक परवाना तपासणारे हे व्यवस्थापन गुजराती नाटकांच्या परवान्याबाबत नेहमीच शिथील भूमिका घेत असतात, असे एका निर्मात्याने सांगितले. नाटय़ परिषदेचा महसूल वाढवण्यासाठी केवळ मराठी नाटकांची भाडेवाढ करणे, हाच एकमेव उपाय नाही. मराठी नाटकांची भाडेवाढ करताना गुजराती नाटकांच्या भाडय़ात केलेल्या कपातीबाबत सोयिस्कररित्या मौन पाळणे योग्य नाही, असे हा निर्माता म्हणाला.
नाटय़ परिषदेने महसूल वाढवण्यासाठी जरूर पावले उचलावीत. मात्र त्यासाठी केवळ मराठी नाटकांना लक्ष्य करून गुजराती नाटकांना झुकते माप देऊ नये, असे एका निर्मात्याने सांगितले. याबाबत मराठी नाटय़निर्माता संघाचे अध्यक्ष प्रशांत दामले यांना विचारले असता, गुजराती नाटकांबाबत आम्ही भाष्य करणे योग्य नाही. तो निर्णय नाटय़ परिषदेने घ्यायला हवा, असे ते म्हणाले.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Aug 2013 रोजी प्रकाशित
नाटय़ परिषदेच्या दुटप्पी भुमिकेमुळे निर्माते नाराज
अखिल भारतीय नाटय़ परिषदेच्या अखत्यारितील यशवंत नाटय़ मंदिरात मराठी नाटकांचे भाडे वाढवण्यात यावे, असा प्रस्ताव नाटय़ परिषदेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत मांडण्यात आला आहे.
First published on: 22-08-2013 at 01:14 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drama council double standard make producer unhappy