वाहने सुरक्षित चालवा‘समुपदेशना’च्या मार्गाने

वाहतुकीचे नियम मोडल्यानंतर केवळ दंड भरून पावती फाडली की आपण सुटलो, या विचारात असलेल्या १६० बाइकस्वारांना अंधेरी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने चांगलाच धडा शिकवला.

वाहतुकीचे नियम मोडल्यानंतर केवळ दंड भरून पावती फाडली की आपण सुटलो, या विचारात असलेल्या १६० बाइकस्वारांना अंधेरी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने चांगलाच धडा शिकवला. हेल्मेटशिवाय बाइक चालवणे, मद्यपान करून गाडी चालवणे, सिग्नल मोडणे आदी विविध नियमभंग करणाऱ्या या बाइकस्वारांचे समुपदेशन करण्याचा वेगळाच उपाय परिवहन कार्यालयाने केला. या समुपदेशनादरम्यान त्यांना नियम मोडल्याने होणारे अपघात, त्यांची भीषणता यांबाबतच्या चित्रफिती दाखवण्यात आल्या. त्यानंतर बाइकचालकांनीच आपली चूक कबूल करत यापुढे सर्व नियम पाळण्याची कबुली दिली.
नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना सहसा दंड घेऊन सोडले जाते. क्वचित कधी एखाद्याचा परवाना जप्त करून रद्द केला जातो. मात्र केवळ दंडावर सुटणाऱ्यांना वाहतुकीचे नियम पाळण्याबाबतचे गांभीर्य लक्षात येत नाही. परिणामी, हेल्मेट न वापरणे, वेगमर्यादेचे भान न ठेवणे, मद्यपान करून गाडी चालवणे, सिग्नल मोडणे असे गुन्हे सर्रास घडतात. यामुळे मुंबईच्या रस्त्यांवरील अपघातांची संख्या वाढते आणि यातील काही अपघात गंभीर स्वरूपाचे असतात.
या सर्वावर तोडगा काढण्यासाठी अंधेरीच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाने नियम मोडणाऱ्या चालकांविरोधातील कारवाई तीव्र करत त्यांचे समुपदेशन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून या परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांनी पश्चिम उपनगरांत धडक कारवाई करत नियम मोडणाऱ्या १६० बाइकस्वारांना पकडले.
त्यानंतर त्यांच्यावर केवळ दंडात्मक कारवाई न करता त्यांचे परवाने ताब्यात घेऊन त्यांना अंधेरीच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात बोलावण्यात आले. अंधेरीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांच्या नेतृत्वाखाली दोन सत्रांत या सर्व बाइकस्वारांसाठी समुपदेशनाचे वर्ग आयोजित करण्यात आले होते.
या समुपदेशन वर्गात विविध वाहतूक नियमांबद्दल माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे अपेक्षित परिणाम साधण्यासाठी या बाइकस्वारांना काही चित्रफितीही दाखवण्यात आल्या. त्यात प्रामुख्याने अपघात झाल्यानंतर हेल्मेट वापरले नसल्यामुळे झालेले नुकसान आणि अपघाताचे वाढलेले गांभीर्य या विषयांवरील चित्रफितींचा समावेश होता. प्रत्येकी दोन तास चाललेल्या या वर्गामध्ये सुरक्षित वाहनचालनावर भर देण्यात आला.
विशेष म्हणजे या १६० जणांपैकी ९० टक्के तरुण असल्याची माहिती कळसकर यांनी दिली. या तरुणांकडून नकळत अपघात होऊ नयेत, त्यात त्यांच्या जिवाला धोका पोहोचू नये, याची खबरदारी घ्यायला हवी. त्यासाठी त्यांना पटेल अशा पद्धतीने वाहतुकीचे नियम समजावून देण्याची जबाबदारी आम्ही या वर्गाद्वारे पार पाडत आहोत, असे त्यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Drive safely