मृत व्यक्तीकडे वाहन चालवण्याचा परवाना नसला तरी शेतकरी अपघात विम्याची रक्कम १ लाख रु. एक महिन्यात वारसदारास देण्याचा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाचे अध्यक्ष प्रभाकर देशपांडे व मंचाच्या सदस्य चारुशीला भुरे (डोंगरे) यांनी न्यू इंडिया इंन्शुरन्स कंपनीस दिला.
गुहा (ता. राहुरी) येथील शेतकरी राजेंद्र बबन कोळसे (वय ३५) हे मोटारसायकलवरुन जात असताना मालमोटरीची धडक बसून १२ एप्रिल २०११ रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांची पत्नी अपेक्षा राजेंद्र कोळसे यांनी न्यू इंडिया इंन्शुरंन्स कंपनीकडे शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा मिळावा म्हणुन मागणी केली. परंतु राजेंद्र कोळसे यांच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना नाही व मुदतीत दावा दाखल केला नाही असे कारण देऊन कंपनीने मागणी नाकारली.
त्यामुळे अपेक्षा कोळसे यांनी वकिल सुजाता बोडखे यांच्यामार्फत ग्राहक मंचाकडे दावा दाखल केला. वाहन चालवण्याचा परवाना नाही व मुदतीत दावा दाखल केला नाही, हा कंपनीच्या वतीने वकिल प्रमोद मेहेर यांनी केलेला युक्तीवाद मंचाने फेटाळला. अपेक्षा यांना विम्याची १ लाख रुपयांची रक्कम मंजूर करताना विमा कंपनीने ती ३० दिवसात द्यावी व मुदतीत न दिल्यास त्यावर ६ टक्के व्याज द्यावे, असा आदेश मंचाने दिला.
संग्रहित लेख, दिनांक 7th Jul 2013 रोजी प्रकाशित
वाहन परवाना नसला तरी शेतकरी अपघात विम्यास पात्र -जिल्हा ग्राहक मंचाचा निकाल
मृत व्यक्तीकडे वाहन चालवण्याचा परवाना नसला तरी शेतकरी अपघात विम्याची रक्कम वारसदारास देण्याचा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाने न्यू इंडिया इंन्शुरन्स कंपनीस दिला.
First published on: 07-07-2013 at 02:15 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Driving license is now not essential for farmer accident insurance