सरत्या वर्षांला निरोप तसेच नववर्ष स्वागतासाठी मद्याच्या पाटर्य़ा झोडून वाहन चालवीत घरी परतणाऱ्या सुमारे तीनशे तळीराम चालकांविरोधात ठाणे वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. विशेष म्हणजे, गेल्या थर्टीफर्स्टच्या तुलनेत यंदा मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या चालकांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. तसेच नववर्ष स्वागताच्या पाश्र्वभूमीवर आयुक्तालयाच्या हद्दीत कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने एकही अपघाताची घटना घडलेली नसल्याचा दावा ठाणे पोलिसांनी केला आहे.  थर्टीफर्स्टच्या पाश्र्वभूमीवर मद्याच्या पाटर्य़ा झोडून नशेत वाहन चालवून अपघातांना आमंत्रण देणाऱ्या तळीराम चालकांविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश ठाणे पोलीस आयुक्त के. पी. रघुवंशी यांनी दिले होते. त्यानुसार, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. श्रीकांत परोपकारी यांनी मद्यपी चालकांविरोधात विशेष मोहीम हाती घेतली. वाहतूक शाखेच्या ठाणेनगर, कोपरी, नौपाडा, वागळे, कापुरबावडी, कासारवडवली, कळवा, मुंब्रा, नारपोली, भिवंडी, कल्याण, कोळशेवाडी, डोंबिवली, विष्णुनगर, उल्हासनगर आणि अंबरनाथ अशा १६ युनिटमध्ये सुमारे आठ श्वास विश्लेषक यंत्राच्या सहय्याने तळीराम चालकांविरोधात कारवाई करण्यात आली. त्यामध्ये ३०१ तळीराम चालक वाहतूक पोलिसांच्या जाळ्यात सापडले असून त्यांना पुढील कारवाईसाठी न्यायालयात पाठविण्यात येणार आहे.
गेल्या वर्षी वाहतूक पोलिसांनी थर्टीफर्स्टच्या पाश्र्वभूमीवर राबविलेल्या मोहिमेत सुमारे ४३६ तळीराम चालकांविरोधात कारवाई करण्यात आली होती. मात्र, आकडेवारी पाहाता गेल्या वर्षांच्या तुलनेत यंदा मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या चालकांच्या संख्येत १३५ ने घट झाली आहे. तसेच यंदाच्या वर्षी एकही अपघाताची घटना घडलेली नाही, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली. यंदा शहरात थर्टीफर्स्टची धामधूम तसेच उत्साह फारसा दिसून आला नाही. दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या घटनेमध्ये युवतीचा मृत्यू झाल्याने देशभरात शोक व्यक्त होत आहे. या सर्व कारणांमुळे यंदा पाटर्य़ा झोडून दारूच्या नशेत वाहन चालविणाऱ्या चालकांच्या संख्येत घट झाली असावी, असा अंदाज एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने व्यक्त केला आहे.