रायगड जिल्हा आणि उरण विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रमुख पक्षांच्या उमेदवारांच्या विरोधात नामसाधम्र्य असलेल्या डमी उमेदवारांचे अर्ज दाखल करण्याची जुनीच परंपरा आहे. यामुळे ग्रामीण भागातील मतदारांची फसगत होऊन मतांची विभागणी होण्यास मदत होते. त्यामुळे अनेक प्रमुख उमेदवारांना याचा फटका बसला आहे. उरण विधानसभा मतदारसंघातही या वेळी प्रमुख पक्षांच्या उमेदवारांची मते घटविण्यासाठी नामसाधम्र्य असलेल्या उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत. यामध्ये शेकापचे उमेदवार विवेक पाटील यांच्या नावाचे तीन, तर काँग्रेसचे उमेदवार महेंद्र घरत यांच्या नावाचे साधम्र्य असलेल्या चार उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आल्याने याचा परिणाम कोणत्या उमेदवारावर अधिक होणार ते पाहावयास मिळणार आहे. मात्र असे अर्ज भरणे म्हणजे निवडणुकीपूर्वीच रडीचा डाव खेळण्यासारखे आहे.
उरणच्या माजी आमदार मीनाक्षी पाटील यांच्याविरोधात यापूर्वी असे प्रयोग करण्यात आलेले होते. याचा फटका मीनाक्षी पाटील यांना बसला होता, तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या विरोधातील नामसाधम्र्य असलेल्या उमेदवारामुळे तटकरे यांनाही फटका बसल्याची घटना ताजी आहे. त्यामुळे निवडणुकीत नामसाधम्र्य असलेल्या उमेदवारांचा शोध घेऊन त्यांना शिदोरी देऊन व त्यांचा संपूर्ण खर्च करून अशा उमेदवारांचे अर्ज दाखल केले गेले असून पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते अशा उमेदवारांचे सूचक आहेत. सध्याच्या अटीतटीच्या निवडणुकीत यामुळे निवडून येण्याची शक्यता असलेल्या उमेदवाराला निसटता पराभव अथवा विजय स्वीकारावा लागतो. निवडणुकीत एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी दोन्ही पक्षांकडून हे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्याने याचा फटका कोणाला बसतो, तसेच आपली मते अशा नामसाधम्र्य असलेल्या उमेदवारांना पडून आपले नुकसान होऊ नये यासाठी पक्षाचे कार्यकर्ते काय करतात, यावर कोणाचे किती नुकसान होणार हे ठरणार आहे.