कापसाच्या पैशातून ५०० ते १००० रुपयांच्या बनावट नोटा मोठय़ा प्रमाणावर चलनात येत आहेत. अशा नोटा आढळल्यानंतरही बँका मात्र त्या नष्ट करण्याऐवजी ग्राहकास परत करीत आहेत! बनावट नोटा आढळल्यास त्वरित गुन्हे दाखल करण्याबाबत बँकांना कळवण्याचे निर्देश पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्य़ातील सर्व ठाणे प्रमुखांना दिले आहेत.
जिल्ह्य़ात यापूर्वीही बनावट नोटा आढळल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. प्रतिवर्षी कापसाच्या हंगामात काही व्यापाऱ्यांकडून या बनावट नोटा चलनात आणल्या जात असल्याची चर्चा आहे. बुधवारी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत एक हजार रुपये किंमतीची बनावट नोट आढळून आली. साक्षाळिपप्री येथील एका शेतकऱ्याने बँकेत पैसे भरण्यासाठी आणल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. बँकेने एक हजाराची नोट बनावट असल्याचे सांगून परत केली. त्या शेतकऱ्याला तांदळा येथील व्यापाऱ्याने ही नोट दिली असल्याचे शेतकऱ्याने सांगितले. या संदर्भात बँकेचे व्यवस्थापक आर. एस. कुवर यांच्याशी संपर्क साधला असता अधूनमधून अशा नोटा सापडत असल्याची कबुली त्यांनी दिली.
या बाबत बँक पोलिसांना कळवत का नाही? याची विचारणा केली असता दर दोन-तीन दिवसांनी असे कळवणे शक्य होत नसल्याचे त्यांनी सांगितले. बँकेकडून या बनावट नोटा ग्राहकांना परत केल्या जात असल्याने त्या पुन्हा चलनात फिरण्याचा धोका वाढला आहे. पोलीस अधीक्षक दत्तात्रय मंडलिक यांनी सांगितले की, या बाबत अजून तक्रारी मिळाल्या नसून बँकांनी बनावट नोटा आढळल्यास तत्काळ पोलिसांत गुन्हे दाखल करावे, अशा सूचना बँकांच्या प्रमुखांना देण्याचे ठाणे प्रमुखांना दिल्या आहेत.