विजयादशमीचा सण रविवारी नगर शहर व परिसरात उत्साहाने व पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. मुहुर्ताचे औचित्य साधत प्रमुख बाजारपेठांतही खरेदी उत्सवाला उधाण आले होते. अनेक नवीन उपक्रमांचे शुभारंभही करण्यात आले. पावसाने आज विश्रांती घेतल्याने नागरिकांनाही सणाचा आनंद लुटता आला.
सायंकाळी आपटय़ाच्या व शमीच्या पानांचे पारंपरिक पद्धतीने नगरकरांनी पुरोहितांच्या मदतीने पूजन केले. त्यासाठी बाजार समिती प्रांगण, दिल्लीगेट, खाकीदासबाबा मठ, केडगाव देवी मंदिर, गुलमोहोर रस्त्यावरील रेणुकामाता मंदिर आदी ठिकाणी गर्दी झाली होती. विविध ठिकाणी रावणदहनाचेही कार्यक्रम करण्यात आले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दरवर्षीप्रमाणे शहरातील प्रमुख रत्यावरून शिस्तबद्ध संचलन केले. सकाळी शहरातील मिठायांच्या दुकानातून गर्दी होती, सणामुळे मिठायांच्या दरातही वाढ झाली. गिफ्ट बॉक्सलाही चांगली मागणी होती. मुहुर्तामुळे बाजारपेठेतूनही खरेदीसाठी गर्दी होती. ग्राहकोपयोगी इल्क्ट्रॉनिक्स वस्तू व वाहनांची दालने, सराफ बाजार ग्राहकांनी फुलून गेले होते. अनेक नव्या दालनांची, फर्मची, उपक्रमांची सुरुवात धुमडाक्यात करण्यात आली.