कान, नाक, घसा तज्ज्ञांची ६५ वी राष्ट्रीय परिषद ३ ते ६ जानेवारी दरम्यान पुण्यात होणार असून जागतिक पातळीवरील २० तज्ज्ञांबरोबरच देशभरातील दोन हजाराहून अधिक डॉक्टर्स या परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत, अशी माहिती या परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ. राजीव यंदे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
यावेळी डॉ. सचिन गांधी, डॉ. अविनाश देशमुख, डॉ. अविनाश वाचासुंदर, डॉ. रंगनाथ वैद्य उपस्थित होते. दरवर्षी भारतातील कान, नाक, घसा तज्ज्ञांची परिषद घेण्यात येते असून २३ वर्षांनी ही परिषद पुण्यात होणार आहे. परिषदेचे उद्घाटन कॅन्सर तज्ज्ञ डॉ. जतिन शहा यांच्या हस्ते होणार आहे. या परिषदेमध्ये तीनशे शोधनिबंध सादर करण्यात येणार आहेत. यावेळी शस्त्रक्रियेसाठी लागणारी साधनसामग्री, वस्तू, श्रवणयंत्रे, औषधे, उपकरणे यांचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले आहे. रोबोट सर्जरी व नव्यानेच विकसित झालेल्या ‘बलून प्लास्टी’ या शस्त्रक्रियांचे प्रात्यक्षिक हे या वर्षीच्या परिषदेचे वैशिष्टय़ आहे.