‘ग्रीन सीटी ड्रिम सीटी’चे स्वप्न पाहणाऱ्या महापालिकेने नागपूर शहरातील विविध भागात एक लाखाच्यावर वृक्षारोपण केले असताना त्यातील अध्र्यापेक्षा जास्त ठिकाणी वृक्षसंवर्धन झाले नसल्यामुळे अध्र्यापेक्षा जास्त रोपटी वाळून गेली आहेत. महापालिकेच्या योजनेचा केवळ सहा महिन्यात बट्टय़ाबोळ झाला आहे.
‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ या संत तुकाराम महाराजांच्या अभंगातून वृक्षाची महती सांगून महापौरांनी या मोहिमेच्या उद्घाटनाच्यावेळी वृक्षसंवर्धनासाठी महापालिकेसह सामाजिक संस्था आणि नागरिकांना समोर येण्याची हाक दिली होती. परंतु, अवघ्या सहा महिन्यानंतर शहरातील विविध भागात लावलेली रोपटी गायब झाली असून त्याभोवतीचे कठडे तेवढे शिल्लक राहिले आहेत. गेल्यावर्षीच्या १ ऑगस्टला शहरातील विविध भागात १ लाखाच्यावर वृक्ष लावण्यात आले. या मोहिमेसाठी महापालिकेतर्फे लाखो रुपये खर्च करण्यात आले होते. काही सामाजिक संस्थांना वृक्ष लागवड आणि सोबतच वृक्षसंवर्धनाची जबाबदारी देण्यात आली होती मात्र, वृक्षारोपण केल्यानंतर काही दिवसपर्यंत नागरिकांनी त्याची निगा राखली, पाणी दिले मात्र त्यानंतर त्या रोपटय़ांच्या वाढीकडे दुर्लक्ष करण्यात आले. हिंगणा मार्गावर विमानतळ प्राधिकरणाच्या जागेवर जवळपास ७ हजाराच्या जवळपास रोपटी लावण्यात आली होती. आता दीड ते दोन हजार झाडे शिल्लक राहिल्याचे दिसून येत आहे. या शिवाय वर्धा रोडवर सोनेगाव तलाव परिसरात आठ हजार रोपटी लावण्यात आली होती. यातील अध्र्यापेक्षा जास्त रोपटी गायब झाली आहे.
हिंगणा मार्गावर सेंट झेवियर्सजवळील परिसरात १२ हजार रोपे लावण्याचा संकल्प करण्यात आला होता. त्या ठिकाणी प्रत्यक्षात सात हजाराच्या जवळापास रोपटीे लावण्यात आली होती. याशिवाय मध्यवर्ती कारागृह, दूध डेअरी, हज हाऊस, दीक्षाभूमी, महापालिका टाऊन हॉल, भांडेवाडीसह शहरातील विविध बोधी विहारात वृक्ष लागवड राबविण्यात आली होती. तेथेही काहीशी अशीच परिस्थती आहे. ज्या सामाजिक संस्थांनी वृक्षसंवर्धनाची जबाबदारी घेतली होती त्यापैकी काही संस्थांनी केवळ छायाचित्रे काढून वर्तमानपत्रात बातमी प्रकाशित करण्यापुरती ती मोहीम राबविल्याचे दिसून आले. उन्हाळ्याची चाहूल लागली असून येणाऱ्या दिवसात पाण्याचा तुटवडा बघता राहिलेल्या झाडांचे अस्तित्व राहील की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या संदर्भात सत्तापक्ष नेते प्रवीण दटके यांनी सांगितले, वृक्ष लागवाडीनंतर वृक्ष संवर्धनाच्या लवकरच महापालिकेच्या उद्यान विभागाची बैठक महापौर घेणार आहेत. ज्या सामाजिक, शैक्षणिक संस्थाना जबाबदारी देण्यात आली होती त्या संस्थांच्या प्रतिनिधी सोबत चर्चा करून किती वृक्षाचे संवर्धन केले जात आहे त्याबाबतचा आढावा घेण्यात येणार आहे. या शिवाय प्रत्येक झोनचे सहायक आयुक्त, अग्निशामक विभागाचे अधिकारी यांच्याकडून लवकरच आढावा घेतला जाणार आहे.