महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि ‘लोकसत्ता’ यांनी संयुक्तरित्या घेतलेल्या इकोफ्रेंडली गणेशोत्सव स्पर्धेत विदर्भातून यशस्वी ठरलेल्या स्पर्धकांना पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम येत्या ६ डिसेंबरला होणार आहे.
‘लोकसत्ता’च्या १९, ग्रेट नाग रोडवरील कार्यालयात येत्या शुक्रवारी दुपारी ३ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी एन.एच. शिवांगी आणि उपविभागीय अधिकारी डॉ. पी.पी. मुंडे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके दिली जातील.
‘आनंदी दरबार भरेल गणराजाचा, जेव्हा लागेल हातभार निसर्ग रक्षणाचा’ या उक्तीचा प्रत्यय घेणाऱ्या विदर्भातील हजारो भक्तांनी त्यांच्या घरातील आकर्षक आणि पर्यावरणस्नेही आरास छायाचित्रांद्वारे पाठविली होती. संपूर्ण उत्सवामध्ये पर्यावरणस्नेही वस्तू व पदार्थाचा वापर करून मिळालेला आनंद व निसर्गाविषयीची कृतज्ञता व्यक्त करणारी पत्रेही त्यांनी पाठविली होती. राज्यभरातून या स्पर्धेला भरघोस प्रतिसाद मिळाला. स्पर्धेसाठी आलेल्या छायाचित्रांमधून प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र पारितोषिके देण्यात आली.
नागपूर विभागातून सोनेगाव (नागपूर) येथील किशोर सावंत हे प्रथम पुरस्काराचे मानकरी ठरले असून, दुसरा पुरस्कार नागपूरच्याच राधा श्याम अतकरी यांना मिळाला आहे. चंदा पिंपळशेंडे (राजुरा, जि. चंद्रपूर) सुचिता सुर्जीकर व करुणा देशमुख (नागपूर) आणि रेणुका निखिल भाले (अकोला) यांना उत्तेजनार्थ बक्षिसे मिळणार आहेत. पहिल्या क्रमांकाला रोख ९ हजार ९९९ रुपये, प्रमाणपत्र व मानचिन्ह, तर दुसऱ्या क्रमांकाला रोख ६ हजार ६६६ रुपये, प्रमाणपत्र व मानचिन्ह देऊन गौरविले जाणार आहे. उत्तेजनार्थ पारितोषिक विजेत्यांना प्रत्येकी रोख २००१ रुपयांसह प्रमाणपत्र व मानचिन्ह दिले जाईल.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ‘लोकसत्ता’च्या सहकार्याने यापूर्वी आयोजित केलेल्या ‘संकल्प हरित पर्यावरणाचा’बाबत अभिनव संकल्प स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ काही दिवसांपूर्वी मुंबईत झाला. या स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळालेल्या यवतमाळ जिल्ह्य़ातील दिग्रसच्या योगेश देशमुख यांना या कार्यक्रमात उपस्थित राहता आले नव्हते. येत्या शुक्रवारी होणाऱ्या कार्यक्रमात देशमुख यांनाही पारितोषिक दिले जाणार आहे.