सुवर्ण महोत्सवी वाटचाल करीत असलेल्या सोलापूर महानगरपालिकेची आर्थिक स्थिती डबघाईला आली असून यात एलबीटी थकबाकीमुळे महापालिकेचे कंबरडे मोडले गेले आहे. त्यामुळे सेवकांचे वेतन दरमहा वेळेवर होण्यास अडचणी येत आहेत. दरम्यान, पालिकेचा कर्जाचा व इतर थकीत देणी रकमेचा बोजा वाढत चालला आहे. सद्य:स्थितीत ३८३ कोटी ६० लाखांची देणी थकीत असल्याचे पालिकेच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले.
यासंदर्भात पालिका आयुक्त अजय सावरीकर यांनी महापौर अलका राठोड यांना पालिकेच्या आर्थिक स्थितीचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर केला आहे. या अहवालात पालिकेची आर्थिक डबघाईची स्थिती नमूद करण्यात आली आहे. एकीकडे आर्थिक बोजा वरचेवर वाढत असताना दुसरीकडे उत्पन्नाचे स्वरूप अतिशय तोकडे असल्याचे दिसून येते. यात एलबीटी थकबाकीचा फटका मोठय़ा प्रमाणात बसल्याचे पाहावयास मिळते. सुवर्ण महोत्सवी वर्षांत पदार्पण केलेल्या या महापालिकेचे चालू २०१३-१४ आर्थिक वर्षांतील पहिल्या दोन महिन्यातील उत्पन्न जेमतेम ४.५८ टक्के म्हणजे केवळ २० कोटी ४४ लाख इतके मिळाले आहे. तर गतवर्षी दिलेल्या उद्दिष्टांपैकी फक्त ५१ टक्के म्हणजे २०६ कोटी ४५ लाख ३१ हजार एवढेच उत्पन्न पालिकेच्या तिजोरीत जमा होऊ  शकले. सध्या केवळ शासकीय अनुवादावर पालिकेचा गाडा चालत असल्याचे दिसून येते. केंद्र व राज्य शासनाच्या अनुदानातून विविध योजनांतून कोटय़वधींची विकास कामे सुरू आहेत. मात्र त्यासाठी स्वत:चा ११७ कोटी ९० लाखांचा हिस्सा भरावयाची कुवत महापालिकेकडे राहिली नाही. त्यामुळे शासनाच्या निधीतून मंजूर झालेली विकास कामे तरी मार्गी लागतील काय, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सध्या महापालिकेची विविध थकीत देणी ३८३ कोटी ६० लाखांच्या घरात असून यात सेवकांची देणी १३४ कोटी, सेवानिवृत्त सेवकांची देणी ४२ कोटी ८ लाख, शासनाच्या विविध योजनांसाठी महापालिकेने भरावयाचा स्वत:चा हिस्सा-११७ कोटी ९० लाख, शासकीय कर्ज व देय रक्कम-३५ कोटी ८० लाख, मक्तेदारांना द्यावयाची थकीत रक्कम-२३ कोटी ३४ लाख, महाराष्ट्र शिक्षण कर व नोकर शाश्वती कर-६ कोटी ६९ लाख, भूसंपादन देय रक्कम-७ कोटी ५३ लाख, महापालिका न्यायालय वेतन व इतर-२ कोटी १० लाख, नगररचना आस्थापना खर्च-एक कोटी २६ लाख व इतर देणी-१० कोटी ६७ लाख या बाबींचा समावेश आहे. पालिकेचा कारभार चालविण्यासाठी दरमहा १६ कोटी ५८ लाखांची रक्कम लागते.परंतु प्रत्यक्षात तिजोरीत केवळ १० कोटी २२ लाखांची रक्कम जमा होते.