जगभरातील विद्यापीठ व नामांकित शिक्षण संस्था यांचा भारतामध्ये प्रवेश झालेला आहे. देशातील खासगी व अभिमत विद्यापीठांचा दर्जा सुधारत आहे. अशावेळी राज्यातील शिक्षण संस्थांची गुणवत्ता वाढण्याच्या दृष्टीने प्राचार्यानी कामकाज पद्धतीत धोरणात्मक बदल करून स्पर्धेत टिकण्यासाठी सक्षम होण्याची गरज आहे, असे मत कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारी येथे बोलताना व्यक्त केले.    
येथील कमला कॉलेजमध्ये महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीन प्राचार्य महासंघातर्फे प्राचार्याच्या ३३ व्या अधिवेशनाला सुरुवात झाली. मंत्री मुश्रीफ यांनी दीपप्रज्वलन करून अधिवेशनाचे उद््घाटन केले. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.    
वनमंत्री व भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ.पतंगराव कदम हे अधिवेशनासाठी उपस्थित राहणार होते. ते न आल्याने मंत्री मुश्रीफ यांनी त्यांची जबाबदारी पार पाडली. मुश्रीफ म्हणाले, विज्ञान-तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये व्यापक प्रमाणात संधी उपलब्ध झाली आहे. शिक्षणामध्ये त्याचा अधिकाधिक वापर कसा करता येईल,याचे नियोजन करून प्राचार्यानी गुणवत्ता वाढीकडे लक्ष दिले पाहिजे. प्राचार्याना जाणविणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले.    
सतेज पाटील म्हणाले, विद्यार्थी महाविद्यालयात आहे तोवरच त्याची जबाबदारी आपली आहे, असा संकुचित विचार प्राचार्यानी करू नये. महाविद्यालयात आणि समाजात वावरतानाही तो विद्यार्थी आपलाच आहे, याची जाणीव ठेवून त्याला घडविण्याच्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.एन.जे.पवार यांनी प्राचार्यावरील वाढती जबाबदारी लक्षात घेऊन त्यांचा बौद्धिकस्तर उंचाविण्यासाठी व गुणवत्ता वाढीसाठी विद्यापीठात एका कार्यशाळेचे आयोजन करणार असल्याचे सांगितले.     
संयोजक प्राचार्य क्रांतिकुमार पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. शैक्षणिक क्षेत्रामध्ये स्पर्धा मोठय़ा प्रमाणात वाढीस लागलेली आहे. त्यांच्याशी सामना करताना शासनाने प्राचार्याना अधिक व्यापक प्रमाणात मदत करण्याची भूमिका घेण्याची गरज आहे, अशी मागणी त्यांनी केली. महासंघाचे सरचिटणीस प्राचार्य एस.बी.लोहिया यांनी अहवाल सादर केला. प्राचार्य नंदकुमार निकम, डॉ.डी.एम.मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा.तेजस्विनी मुडेकर व प्रा.नीता धुमाळ यांनी सूत्रसंचालन केले.