गाय ही भारतीय संस्कृतीचा मूळ आधार असला तरी गेल्या काही वषार्ंत गायीबाबतीतचा आर्थिक, वैज्ञानिक दृष्टिकोन बदलत आहे. पंचगव्यातील औषधी गुणांमुळे असाध्य रोगांवर उपचार केले जात असून गोमूत्र शेतीसाठी अतिशय उपयुक्त ठरत आहेत. आता त्यापासून वीज निर्मिती केली जात आहे. त्यादृष्टीने अधिक संशोधन होत आहे. गोमूत्रापासून घडय़ाळ आणि गणकयंत्रे क्रियान्वित करण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे. येणाऱ्या काळात अन्य उपकरणे तयार करण्यासाठी काही शेतकरी आणि संशोधक प्रयत्न करीत आहेत.
गोमूत्रापासून तयार होणारा कामधेनू अर्क मूत्रपिंडाच्या व्याधीवर अत्यंत उपयोगी ठरला असून त्यामुळे काही रुग्णांचे डायलेसीस बंद झाले आहे तर काहींचे प्रमाण कमी झाले, असा दावा या औषधांची निर्मिती करणाऱ्या देवलापार येथील गो विज्ञान अनुसंधान केंद्राने केला आहे. गोमूत्र आणि शेणापासून तयार होणाऱ्या औषधांचा उपयोग अनेक दुर्धर व्याधींवर होत आहे. त्यापासून वीज निर्मिती कशी करता येईल, यादृष्टीने संशोधन सुरू झाले आहे. गोमूत्र आणि शेणापासून वेगवेगळ्या औषधी निर्माण केल्या जात आहेत. आता त्यापासून अधिक प्रमाणात वीज निर्मिती करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी देवलापार भागात संशोधन सुरू आहे. काही राज्यांमध्ये गोबरगॅसपासून वीज निर्मिर्ती करण्याचा प्रयोग यशस्वी करण्यात आला. गो विज्ञान अनुसंधान केंद्रामध्ये तसा प्रयोग करण्यात आला आणि तो यशस्वी झाला आहे.
या केंद्रातील शास्त्रज्ञांनी देशी गायीच्या गोमूत्रावर गणकयंत्र (कॅलक्युलेटर) आणि घडय़ाळ सुरू करण्याचा प्रयोग यशस्वी करून दाखविला. येणाऱ्या काळात त्यावर जास्तीजास्त वीज निर्मिती करून उपकरणे क्रियान्वित करता येतील. यादृष्टीने संशोधन सुरू झाले आहे. गोमूत्रापासून ऊर्जेच्या अविष्काराच्या कल्पनेला संपूर्ण जगात वास्तविक रूप देण्याचे काम अनुसंधान केंद्राने केले आहे. देवलापार येथील शिक्षक जगन्नाथ गाड यांनी हा प्रयोग यशस्वी केला आहे. दोन डब्यात देशी गायीचे अर्धाअर्धा लिटर गोमूत्र घेऊन एकात तांबे आणि एकामध्ये जस्त टाकून गणकयंत्र आणि घडय़ाळ सुरू करण्यात आले.
या प्रयोगानंतर जास्तीत जास्त उपकरणे चालविण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. साधारणत: चार महिन्यांपर्यंत हे घडय़ाळ गौमूत्रावर सुरू राहू शकते, अशी व्यवस्था आहे. शेणापासून गोबरगॅस आणि त्यापासून वीज निर्मिती करण्यासंदर्भातील संशोधन देवलापारमध्ये सुरू आहे. अन्य राज्यातही असे प्रयोग सुरू झाले आहेत. हिंदू संस्कृतीमध्ये शेणापासून तयार होणाऱ्या गोवऱ्याला महत्त्व आहे. रुग्णालयांमध्ये जमा होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावताना गोबरगँसचा उपयोग केला जातो. या संदर्भात गो विज्ञान अनुसंधान केंद्राचे प्रभारी सुनील मानसिंहका यांनी सांगितले, गोमूत्रापासून वीज निर्मितीचा प्रयोग सुरू असून त्यावर अधिक संशोधन केले जात आहे. वर्तमान काळात त्यावर अधिक प्रयोग केले जाण्याची शक्यता आहे. गोमूत्रापासून हायड्रोजन निर्माण होऊ शकतो आणि त्यापासून वीज निर्मिती होऊ शकते. साधारणत: एक गाय दिवसाला ४ ते ५ लिटर गोमूत्र देते. त्यामुळे येणाऱ्या काळात गायींची संख्या वाढली तर गोमूत्र वाढेल आणि त्याचा उपयोग येणाऱ्या काळात वीज निर्मितीसाठी होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Electricity generation from cow urine
First published on: 28-01-2015 at 08:18 IST