शासकीय वैद्यकीय रुग्णालयासह मेयो रुग्णालयात आकस्मिक विभाग सुरू करण्यात येणार आहे. या विभागात दोन तज्ज्ञ डॉक्टर आणि परिचारिकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. अपघातामध्ये गंभीर जखमी झालेले, विषप्राषण केलेले किंवा क्रिटिकल अवस्थेत असलेले रुग्ण रात्री-बेरात्री किंवा दिवसाही रुग्णालयात आले तर त्यांच्यावर तात्काळ उपचार होत नसल्यामुळे त्यांचा मृत्यू होतो. या शिवाय कॅज्युएल्टीमध्ये रुग्ण उपचारार्थ आल्यावर त्याच्यावर किरकोळ उपचार करून दाखल केले जाते मात्र आता रुग्णाला तात्काळ उपचार मिळावे आणि त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची चमू उपलब्ध राहावी या दृष्टीने आकस्मिक विभाग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली. या आकस्मिक विभागात अत्याधुनिक सेवा उपलब्ध राहणार असून त्यासाठी वेगळा निधी देण्याची वेळ आली तर तो सुद्धा उपलब्ध करून देण्यात येईल. रुग्णालयात एखाद्या विशिष्ट कंपनीची औषधे उपलब्ध असताना दुसऱ्या कंपनीची तीच औषधे रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेर आणावयास सांगत असतील तर संबंधित डॉक्टरांना ताकिद देण्यात येणार आहे. बीपीएल किंवा सिकलसेल रुग्णांना  विनाकारण त्रास दिला जात असेल आणि त्यांच्या तक्रारी जर वैद्यकीय विभागाकडे असल्या तर संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश गावित यांनी दिले. शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या सुरक्षेच्या दृष्टीने सीसी टीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढविण्यात येणार आहे. मधल्या काळात प्रसूती विभागातून मुले पळविण्याचे किंवा बाळाला ठेवून महिला पळून जाण्याचे प्रकार उघडकीस आल्यामुळे प्रत्येक वॉर्डात आणि जिथे आवश्यकता आहे त्या ठिकाणी सीसी टीव्ही कॅमेरे लावण्यात येणार असल्याची माहिती डॉ. गावित यांनी दिली.