नवी मुंबईचा अविभाज्य घटक असणाऱ्या ऐरोली नगरीत नाटय़ रसिकांसाठी पहिले अद्ययावत नाटय़गृह लवकरच साकारणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ मध्ये हे नाटय़गृह साकारलं जाणार आहे. आगरी कोळी मराठी बाणा जपणाऱ्या ऐरोली शहरासाठी जरी हे नाटय़गृह भूषणावह ठरणार असले तरी आशिया खंडातील तिसरे आधुनिक नाटय़गृह म्हणून ते नावारूपाला येणार आहे.
नवी मुंबई शहराचे सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखले जाणारे वाशी येथील विष्णुदास भावे नाटय़गृह नाटय़रसिकांचे जिव्हाळ्याचे स्थान आहे. नवी मुंबईतील विशेषत्वाने घणसोली, ऐरोली, दिघा विभागातील नागरिकांना विष्णुदास भावे नाटय़गृह हे अंत्यत लांब होते, तर वाहनांची पर्यायी व्यवस्था नसल्याने नाटकांचा आस्वाद घेण्यासाठी नाटय़प्रेमींना ठाण्यातील गडकरी रंगायतनला जावे लागत होते. त्यामुळे इच्छा असूनही नाटय़ रसिकांना अनेक गोष्टींमुळे रसिकतेला मुरड घालावी लागत होती. याकरिता ऐरोलीतील लोकप्रतिनिधींनी ऐरोली परिसरातच मध्यवर्ती ठिकाणी नाटय़गृह असावे अशी सातत्यपूर्ण मागणी होती. ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप नाईक हेदेखील सातत्याने पाठपुरावा करीत होते. या सर्व प्रयत्नांस यश येऊन अखेरीस सिडकोमार्फत नवी मुंबई महानगरपालिका प्रभाग क्रमांक १३ येथील सेक्टर ५ ऐरोली परिसरातील आरक्षित भूखंड क्रमांक ३७ नवी मुंबई महानगरपालिकेस हस्तांतरित करण्यात आला आहे. सुमारे २८९६.२९ चौ.मी. बांधकाम क्षेत्रफळात नवीन नाटय़गृहची डौलदार इमारत उभारण्यात येत आहे. नाटय़गृह उभारणीकरिता ६०कोटी ७० लाख ९ हजार ९०९ रुपये खर्च करण्यात येणार आहे.
 ऐरोली विभाग हा ठाणे शहराला व मुलुंड-ऐरोली खाडी पुलामुळे मुंबईला अत्यंत नजीकचा व वाहतुकीच्या दृष्टीने सोयीचा विभाग झाला आहे. ऐरोली, दिघा, घणसोली येथील नागरी वस्तीतही मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे या नवीन नाटय़गृहाद्वारे या परिसरातील तसेच नजीकच्या ठाण्यातील विटावा, कळवा, खारेगांव तसेच मुंबईतील मुलुंड, नाहूर, भांडूप भागातील नाटय़ रसिकांनाही उत्तम कलारंजन पर्याय उपलब्ध होणार आहे.
नाटय़गृहातील सुविधा
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पद्धतीने उभारण्यात येणाऱ्या या नव्या नाटय़गृहाच्या तळाला ८७ वाहनाचीं पार्किंगची सुविधा त्याचबरोबर द्विमजली स्वतंत्र लिफ्टची सुविधा असणारे वाहनतळ असणार आहे. तळमजल्यावर तिकीटघर, रंगीत तालीम कक्ष तसेच पुरुष व महिला प्रसाधनगृह व्यवस्था असणार आहे. पहिल्या मजल्यावर उपाहारगृह आणि सौंदर्य प्रसाधनगृह (मेकअप रूम) सुविधा असणार आहे. दुसऱ्या मजल्यावर १००० आसन क्षमतेचे प्रेक्षकगृह व ग्रीनरूम तसेच मोठय़ा आकाराचे प्रशासकीय दालनही असणार आहे. तिसऱ्या मजल्यावर उपाहारगृह, अधिकारी कक्ष व दोन अतिथीगृहे असणार आहेत. त्याचप्रमाणे चौथ्या मजल्यावर दोन विशेष अतिथीगृहे आणि अधिकारी कक्ष असणार आहे.
*ऐरोलीमध्ये नाटय़गृह झाल्यानंतर या ठिकाणी नवीन कलाकार तयार होतील. तसेच ऐरोलीकरांना ठाण्याला किवा वाशी येथे न जाणता ऐरोलीतच नाटक बघण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
जयराज नायर , सिने अभिनेता
*ऐरोलीमध्ये जे नवीन नाटय़गृह होणार आहे, ते राजकीय मंच न राहता तिथे जास्तीत नाटय़, सांस्कृतिक कार्यक्रम व्हावे; तसेच ऐरोलीमध्ये होणारे नाटय़गृह हे नाटय़ कलावंतांच्या ताब्यात द्यावे.
प्रशांत निगडे, सिने अभिनेता