व्यवसायात नैतिक मूल्यांचे पालन केले पाहिजे, ग्राहकाला काय पाहिजे, त्याची अपेक्षा काय हे तुम्हाला ओळखता आले पाहिजे, ग्राहकांशी प्रेमाने, आपुलकीने वागले पाहिजे, त्यांचे मन जिंकले तर यशस्वी होण्याचा तुमचा मार्ग अधिक सुकर होईल हे आजच्या तरूणाईने विसरता कामा नये. कष्टाची लाज न बाळगता उद्योग करणारांच्या पाठीशी कराड अर्बन बँक उभी राहील, असा विश्वास डीएसके ग्रुपचे अध्यक्ष डी. एस. कुलकर्णी यांनी व्यक्त केला.
कराड अर्बन बँक व सातारच्या अण्णासाहेब चिरमुले ट्रस्टतर्फे आयोजित उद्योजकता विकास शिबिरात ते बोलत होते. अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाषराव एरम, उपाध्यक्ष डॉ. राजीव अहिरे, मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव, अर्बन परिवारातील सर्व पदाधिकारी, संचालक व सेवकवर्ग तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी शिबिरास उपस्थित होते. सुभाषराव जोशी यांच्या हस्ते डी. एस. कुलकर्णी यांचा श्री महालक्ष्मीची प्रतिमा देऊन याप्रसंगी सत्कार करण्यात आला.
डी. एस. कुलकर्णी म्हणाले की, पैसा, भांडवल, कुणाचा वरदहस्त नसला तरी फक्त कष्टाची लाज वाटू न देता प्रामाणिकपणे व सचोटीने मिळेल तो उद्योग करा यश निश्चित मिळते. यावर विश्वास ठेवा आपल्या मागे कराड अर्बन बँक निश्चिपणे उभी राहील. तरुणांना मोठं व्हायचे असेल तर मोठी स्वप्नं पहायला शिकायला पाहिजे. मी माझ्या जीवनपटामध्ये छोटे, छोटे अनेक उद्योग केले. त्यातून अनेक माणसे जोडली गेली, अनेक अडीअडचणींचा सामना करताना अनेक अनुभव घेता आले. त्यामुळे मला सतत नवीन काही करण्याची प्रेरणा मिळत गेली. चने मणे, पेपर विक्रीचा व्यवसायातून यशस्वी होण्याचे अनेक मंत्र मिळाले ते कुठेही सहजासहजी मिळणार नाहीत. जीवनात यशस्वी होण्यासाठी माझ्या संघर्षमय वाटचालीत माझ्या पत्नीने मला दिलेली साथही तितकीच मोलाची असल्याचे त्यांनी सांगितले.  
डॉ. सुभाषराव एरम म्हणाले की, विविध उद्योगांचे जाळे निर्माण करून अनेकांच्या हृदयात आपल्या कर्तृत्वाने स्थान निर्माण करणारे, शून्यातून विश्व निर्माण करणारे सामान्यातील सामान्य अशी डी. एस. कुलकर्णी यांची ओळख आजच्या तरुणाईला निश्चितच प्रेणादायी ठरेल. कराड अर्बन बँकेने अशा व्यासंगी व कर्तृत्वान व्यक्तींचे तरुणांना मार्गदर्शन मिळावे यासाठी हे शिबिर आयोजित केले आहे. त्यातून देशाच्या भावी पिढीने आदर्श घ्यावा व आपले भवितव्य घडवावे.