प्रदीर्घ काळापासून केवळ चर्चेत अन् प्रतीक्षेत राहिलेले ‘प्रि-पेड’ अॅटोरिक्षाचे स्वप्न अखेर नाशिकरोड रेल्वे स्थानकापासून प्रत्यक्षात येण्याच्या दृष्टिने सकारात्मक पावले पडू लागली आहेत. रेल्वे स्थानकाहून शहरातील विविध भागात जाण्यासाठी ‘प्रि-पेड अॅटोरिक्षा’ योजना प्रायोगिक तत्वावर सुरू करण्याचा निर्णय प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला. एका सहकारी संस्थेच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमात भाडे दरपत्रक प्रवाशांना कक्षावर मिळेल. तसेच ही सेवा चालविणाऱ्या संस्थेला सेवा शुल्कापोटी दोन रूपये दिले जाणार आहे. मीटरप्रमाणे जितके भाडे होते, त्यापेक्षा २० टक्के अधिक रक्कम या सेवेसाठी मोजावे लागणार आहे. तथापि, ही सुरक्षित व निश्चित दराची सेवा असल्याचे प्राधिकरणाने म्हटले आहे. महत्वाची बाब म्हणजे, मालेगाव शहरात सात मार्गावर तसेच मनमाड शहरात दोन मार्गावर ‘शेअर ए अॅटोरिक्षा’ योजनेला मान्यता देण्यात आली आहे.
प्राधिकरणाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. गेल्या काही वर्षांपासून शहरात प्रि-पेड अॅटोरिक्षा सुरू करण्याची मागणी नागरिकांसह वेगवेगळ्या संघटनांकडून केली जात होती. परंतु, शहरात शेअर ए अॅटोरिक्षा अथवा चालकांच्या मनमानीनुसार भाडे आकारणी या केवळ दोन पद्धतीने प्रवास करणे प्रवाशांना भाग पडत होते.
रात्रीच्यावेळी बस अथवा रेल्वे स्थानकावर उतरणाऱ्या प्रवाशाला तर परगावाहून येण्यास जितके भाडे लागले नसेल तितके भाडे रिक्षासाठी मोजावे लागत होते. रिक्षा चालकांकडून होणारी ही लूट रोखण्यासाठी वारंवार आवाज उठविला जात असला तरी त्यांना लगाम घालण्यात वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभाग अपयशी ठरल्याचे दिसत होते. या पाश्र्वभूमीवर, केवळ नाशिकरोड रेल्वे स्थानकावरून का होईना प्रि-पेड सेवेच्या दिशेने पडलेली ही पावले निश्चित आशादायक म्हणता येईल. मुंबई व पुणे शहरात या स्वरूपाची सेवा अस्तित्वात आहे. त्याच धर्तीवर ती नाशिकमध्येही राबविली जाईल, असे पाटील यांनी नमूद केले.
रेल्वे स्थानकावरून शहरातील विविध भागात जाऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांना प्रि-पेड सेवेचा लाभ घेता येईल. ही सेवा प्रायोगिक तत्वावर चालविण्यासाठी भारतरत्न मागासवर्गीय सहकारी ग्राहक संस्था मर्यादीत या संस्थेला एक वर्षांसाठी देण्यात आली आहे. प्रवाशांना ज्या ठिकाणी जावयाचे आहे, त्याचे दरपत्रक त्यांना आधीच कक्षावर दिले जाईल, असे पाटील यांनी सांगितले.  
मालेगाव शहरात सात मार्गावर तर मनमाड शहरात दोन मार्गावर शेअर ए अॅटोरिक्षा योजनेला मान्यता देण्यात आली आहे.
इलेक्ट्रॉनिक मिटर बसविलेल्या टॅक्सींसाठी पहिल्या एक किलोमीटरसाठी २० रूपये तर पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी १६ रूपये भाडे दर निश्चित करण्यात आले आहे. परिवहन वाहनांचे मुदतीत योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण न केलेल्या वाहनांवर आता प्रती दिवसाच्या विलंबास एक दिवस परवाना निलंबन, याऐवजी अॅटोरिक्षाला प्रतिदिवस ५० रूपये तर बस व मालमोटारीसाठी प्रतिदिन १०० रूपये दंडात्मक कारवाई होईल. याची अंमलबजावणी १६ ऑगस्टपासून सुरू होईल.
मीटरच्या तुलनेत
२० टक्के अधिक भाडे
शहरात कोणत्याही ठिकाणी जाण्यासाठी प्रवाशांना मीटरप्रमाणे जितके भाडे द्यावे लागते, त्यापेक्षा २० टक्के अधिक रक्कम या सेवेसाठी मोजावी लागणार आहे. प्रि-पेड सेवा चालविणाऱ्या संस्थेला सेवा शुल्क म्हणून दोन रूपये निश्चित करण्यात आले आहे. या माध्यमातून प्रवाशांना सुरक्षित व निश्चित दराची सेवा उपलब्ध होईल. अॅटोरिक्षा चालकांबाबत काही तक्रार असल्यास वाहतूक पोलीस, प्रादेशिक परिवहन विभागाला १८००२३३१५१६ या ‘टोल फ्री’ क्रमांकावर तक्रार करता येईल.