महिलांसाठी टॅक्सी सेवा सुरू करणाऱ्या वीरा कॅब्जमधील प्रत्येक महिलेची एक स्वतंत्र कहाणी आहे.
वैशाली प्रदीप शेवडे –
वैशालीचा प्रेमविवाह झाला. मात्र मुलाच्या गंभीर आजारात जबाबदारी झटकून मित्रांसोबत दारू पित फिरणाऱ्या नवऱ्याला सोडचिठ्ठी देऊन ती आई-वडिलांकडे निघून आली. महापालिकेतून मुकादम म्हणून सेवानिवृत्त झालेल्या वडिलांना अर्धांगवायूचा झटका आला. त्यामुळे घरात बसून राहण्यापेक्षा काहीतरी करावे या उद्देशाने तिने घराबाहेर पाऊल टाकले. ‘वीरा कॅब्ज’ या कंपनीमध्ये ती गाडी शिकली आणि आज महिन्याला १० हजार रुपये कमावत, आई-वडिलांना सांभाळतानाच मुलाच्या आजारपणाचा खर्चही समर्थपणे पेलला. तिचा मुलगा वरळीच्या पालिका शाळेमध्ये इंग्रजी माध्यमात शिकत आहे. त्याला भरपूर शिकवायचे आहेच पण त्याला जबाबदारीची जाणीव आणि ती पेलण्याची ताकद त्याच्यात यावी यासाठी ती दक्ष आहे. ‘कमावती’ म्हणून घरात तिला कोणी काम करू देत नाही. पण तिला तसे स्वामीत्व नको आहे. मी त्यांचीच मुलगी आहे आणि कमावती म्हणून त्यांना माझा सार्थ अभिमान आहे, असे ती सांगते तेव्हा तिचे डोळे बरेच काही सांगून जातात.

जिता प्रवीण आरेकर  
जिता यांचे पती बोइसरच्या निरलॉन कंपनीत होते. काही कारणास्तव कंपनी बंद पडली आणि घराचा आर्थिक गाडा घसरला. जेमतेम दहावी उत्तीर्ण असलेल्या जिता डहाणूला राहत होत्या. त्यांच्या घरातील ओढाताण माहेरच्यांना पाहवली नाही आणि त्यांनी जिताला कुटुंबीयांसह माहिमच्या मच्छिमार वसाहतीत आणले. सासू, दीर, मुलगी यांच्यासह त्या मुंबईत आल्या. सुरुवातीला नणंदेने त्यांना सोबत गोरेगावच्या नागरी निवारा वसाहतीजवळील मार्केटमध्ये मासे विकण्यासाठी नेले. पण दिवसाला केवळ २५० ते ३०० रुपये मिळत होते. नवऱ्याला अर्धांगवायू झालेला तर मुलगी शाळेत जाणारी. एक दिवस मुलीनेच रेडिओवर ‘वीरा कॅब’ची जाहिरात ऐकली आणि तिने आईला गळ घातली. नवऱ्यासह सासू, आई-वडील सर्वांनीच तिला प्रोत्साहन दिले आणि जिता आधुनिक चक्रधर बनली. प्रशिक्षणासाठी पँट घालून जाताना आजूबाजूच्या नजरा वेगळे बोलू लागल्या. पण आपल्या घरासाठी तिने त्याही सहन केल्या. जेव्हा गाडी शिकून त्या नोकरी करू लागल्या तेव्हा घरातल्यांना आनंद झालाच. पण रुइया महाविद्यालयात कला शाखेतून बारावीची परीक्षा देत असलेली मुलगी प्राची अभिमानाने आईचे कौतुक मैत्रिणींना सांगू लागली तेव्हा जगण्याचे सार्थक झाल्याची प्रतिक्रिया जिता यांनी दिली.  

सुनीता यादव
बनारसच्या गाजीपूरची सुनीता आक्रमक स्वभावामुळे घरातून बाहेर पडली. घरामध्ये आपल्याला कस्पटासमान वागणूक देणाऱ्या भाऊ आणि वहिनीपासून फारकत घेत तिने मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा हातात पैसेही नव्हते. कानातल्या रिंगा विकून तिने पैसे उभे केले. मुंबईत चुलत बहिणीने खूप मदत केल्याचे ती आवर्जून सांगते. आज एका चाळीत बहिण आणि तिच्या मुलासह ती राहते. मुंबईतल्या अडचणींना सामोरे जाताना तिने कोणाचा विशेष आधार घेतला नाहीच. पण कोणापुढे हातही पसरला नाही. वीरामध्ये येण्यापूर्वी ती एका सुरक्षा एजन्सीमध्ये नोकरी करीत होती. पण केवळ दोन-तीन हजारात काही होऊ शकत नाही, हे जाणवल्यावर मोठय़ा पगाराची नोकरी ती शोधू लागली आणि ती ‘वीरा’मध्ये आली. आता दरमहा मिळणाऱ्या पगारात ती बहिणीच्या मुलाला मोठय़ा शाळेत चांगले शिक्षण देण्याचे स्वप्न पाहत आहे.