पोलीस दलात काम करताना प्रत्येक क्षण हा कसोटीचा असून दिवसभरात अशा अनेक क्षणांचा सामना पोलिसांना करावा लागतो असे उद्गार राज्य महामार्गाच्या पोलीस अधीक्षक डॉ. रश्मी करंदीकर यांनी ठाणे येथे काढले. येथील आय.पी.एच. संस्थेच्या वतीने आयोजित ‘वेध’ परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी विविध विषयांवर त्यांनी उपस्थितांशी संवाद साधाला.
पोलीस दलात काम करताना बऱ्याच गोष्टी शिकता आल्या. कठीण प्रसंगांना तोंड देण्याची हिंमत वाढली. तसेच समोरच्या व्यक्तीचे ऐकून घेण्याची क्षमताही चांगल्यारितीने आत्मसात करता आली, असे त्यांनी सांगितले. एखाद्या व्यक्तीस न्याय मिळवून दिल्यावर समाधानाने फुलणारा तिचा चेहरा हा पोलिसांसाठी सर्वकाही असतो, असे त्यांनी सांगितले. पोलीस दलात महिलांबरोबर कोणताही भेदभाव केला जात नसून त्यांना पुरुषांप्रमाणेच समान वागणूक दिली जाते. घरी येण्याची वेळ निश्चित नसणे, सुट्टीच्या दिवशीही काम करावे लागणे अशावेळी पोलिसांना मिळणारे कौटुंबिक पाठबळ फार महत्वाचे असते. राष्ट्रध्वजाला सलामी देताना मनात येणाऱ्या भावना शब्दात वर्णन करणे अशक्य आह,े असे त्यांनी अभिमानाने सांगितले.
कोणताही पोलीस अधिकारी व्यक्ती नाही तर व्यवस्था म्हणून काम करतो असे त्यांनी सांगितले.  पोलीस दलात काम करताना अनेक दु:खद प्रसंगांना सामोरे जावे लागते. यावेळी मन कठोर ठेवता येणे अतिशय महत्वाचे असते, यावेळी आवडीच्या क्षेत्राची निवड करून मेहनतीच्या जोरावर पुढे येण्याचा सल्ला  त्यांनी उपस्थित तरुणांना दिला.