जिल्ह्यात मतदानाच्या दिवशी नियुक्त केल्या जाणाऱ्या १८ हजार ७४७ अधिकारी व कर्मचाऱ्यांची सरमिसळ करण्याचा दुसरा टप्पा शुक्रवारी निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत पार पडला. ही प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी कोणत्या मतदान केंद्रावर कोणते अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक नियुक्त होईल ही बाब मतदानाच्या आदल्या दिवशी स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत ही बाब गोपनीय राहील. याशिवाय इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात मतपत्रिका समाविष्ट करून ते बंदिस्त करण्याची प्रक्रिया १४ व १५ एप्रिलदरम्यान होईल.
जिल्ह्यात नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघासह धुळे मतदार संघाचाही काही भाग समाविष्ट होतो. मतदानासाठी नाशिक मतदारसंघात १६६४, दिंडोरी १७५० तर धुळे जिल्ह्यात ७७७ असे एकूण ४१९१ मतदान केंद्र आहेत. मतदानाच्या दिवशी या ठिकाणी तब्बल १८ हजार ९४७ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात केला जाणार आहे. संबंधितांचे नाव ज्या मतदार यादीत आहे, त्या तालुक्यात संबंधितांची नेमणूक होऊ नये असा निकष आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची सरमिसळ करण्याचा पहिला टप्पा आधीच पूर्ण झाला होता. दुसरा टप्पा शुक्रवारी निवडणूक निरीक्षक पी. के. मोहंती यांच्या उपस्थितीत करण्यात आला. संगणकीय आज्ञावलीच्या मदतीने ही प्रक्रिया पार पडल्याची माहिती दिंडोरी मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी भानुदास पालवे यांनी दिली. निवडणूक कर्मचाऱ्यांची ही प्रक्रिया पार पडली असली तरी कोणत्याही अधिकारी वा कर्मचाऱ्याला आपण कोणत्या मतदान केंद्रावर नियुक्त होणार हे लगेच समजू शकणार नाही. ही बाब गोपनीय राखण्यात आली आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी संबंधितांना निवडणूक साहित्य वितरित करताना नियुक्त झालेल्या केंद्राबाबत कल्पना दिली जाणार आहे.
दरम्यान, नाशिक, दिंडोरी व धुळे लोकसभा मतदारसंघांसाठी सेना दलातील ८९०६ मतदारांच्या मतपत्रिका शुक्रवारी टपालाद्वारे रवाना करण्यात आल्या. उमेदवारी अर्ज माघारीच्या मुदतीनंतर हे काम ४८ तासांच्या आत होणे बंधनकारक आहे. त्या अनुषंगाने गुरुवारी रात्रभर हे काम पूर्णत्वास नेण्यात आले. यापुढील टप्पा आहे तो इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणेत मतपत्रिका समाविष्ट करण्याचा. निवडणूक यंत्राचे ‘बॅलेट युनिट’ आणि ‘कंट्रोल युनिट’ असे दोन भाग असतात. बॅलेट युनिटमध्ये मतपत्रिका समाविष्ट करावी लागते. दिंडोरी मतदार संघासाठी ही प्रक्रिया १४ व १५ एप्रिल रोजी सिडकोतील संभाजी स्टेडिअमवर होणार असल्याचे पालवे यांनी सांगितले. यावेळी उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. बॅलेट युनिटमध्ये मतपत्रिका समाविष्ट करणे आणि यंत्रात बॅटरी टाकून ती बंदिस्त करण्याची प्रक्रिया उमेदवारांच्या प्रतिनिधींसमक्ष पार पडणार आहे.
‘पैशांचे वाटप होण्याची शक्यता
असलेली ठिकाणे शोधा’
निवडणूक काळात जिल्ह्यातील कोणत्या भागात उमेदवारांकडून मतदारांना पैशांचे वाटप होण्याची शक्यता आहे, अशी संवेदनशील ठिकाणे शोधण्याची सूचना खर्च निरीक्षकांनी जिल्हा प्रशासनाला केली आहे. मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी उमेदवारांकडून पैशांचे प्रलोभन दाखविले जाण्याची शक्यता आहे. या पाश्र्वभूमीवर, खर्च निरीक्षकांनी मागील निवडणुकीत या स्वरूपाच्या घडलेल्या प्रकारांची माहिती संकलित करून उपरोक्त संवेदनशील भाग निश्चित करण्याचे सूचित केले. पैसे वाटप अथवा मद्य वाटप तसेच मतदार प्रभावित होतील अशा बाबींसाठी उमेदवाराने केलेला खर्च बेकायदेशीर ठरतो. नाशिक व दिंडोरी मतदार संघात असे प्रकार घडू नयेत याकरिता जिल्हा निवडणूक यंत्रणेने खास भरारी व स्थायी पथकांची नियुक्ती केली आहे. याच बरोबरीने ज्या भागात पैसे वाटप व तत्सम प्रकार घडण्याची शक्यता आहे, अशी ठिकाणे आधीच धुंडाळण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. मत देण्याकरिता ज्या भागात मतदारांना पैशांचे वाटप होऊ शकते, असे शहरी व ग्रामीण भागातील ठिकाणे शोधण्यासाठी निवडणूक शाखा पोलीस यंत्रणेची मदत घेणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 12th Apr 2014 रोजी प्रकाशित
सोमवारी ‘ईव्हीएम’ यंत्र मतपत्रिकांसह बंदिस्त होणार
जिल्ह्यात मतदानाच्या दिवशी नियुक्त केल्या जाणाऱ्या १८ हजार ७४७ अधिकारी व कर्मचाऱ्यांची सरमिसळ करण्याचा दुसरा टप्पा शुक्रवारी निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत पार पडला.
First published on: 12-04-2014 at 01:08 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Evm machine preparation for election