त्यांच्याकडे स्वत:च्या पैशाने रंग, ब्रश, कॅनव्हास घेण्याइतकेही पैसे नाहीत, पण कल्पकता आणि कलेच्या देणगीने त्यांचा खिसा पुरेपूर भरला आहे. प्रत्येकाचा ब्रशचा फटकारा एक वेगळी कहाणी सांगतो. कधी रस्त्याच्या कडेला, रात्रीच्या थंडीत पानाच्या बाकडय़ावर मुटकुळं करून झोपलेलं निष्पाप बालपण. कधी पुरात किंवा धरणाच्या विस्थापनात वाहून गेलेलं घर. कधी असहाय्य मातेच्या डोळ्यात तरळलेले अश्रू. या कहाण्या दुसऱ्या-तिसऱ्या कुणाच्या नसून त्यांच्या स्वत:च्या आहेत. जीवनातील दु:ख, निराशा, अपमान याच छटा अनुभविलेल्या या मुलांच्या चित्रांचे प्रदर्शन २६ डिसेंबरला ‘जे. जे. स्कूल ऑफ अप्लाइड आर्ट्स’ या संस्थेत भरविण्यात येणार आहे.
ही मुले समाजातील वंचित घटकांमधून आली आहेत. पैशाची नसली तरी स्वानुभवांची श्रीमंती त्यांच्याकडे पुरेपूर आहे. हीच श्रीमंती या मुलांच्या चित्रांमधून अनुभवता येईल. नवजीवन केंद्राच्या वतीने भरविण्यात आलेल्या या प्रदर्शनात मुंबईतील १३ विविध स्वयंसेवी संस्थांमधील मुलांनी काढलेल्या तब्बल १०० चित्रांचा समावेश असेल. ‘नवजीवन केंद्र’ ही संस्था वेश्या, असहाय्य, निराधार महिला आणि त्यांची मुले यांच्या विकासासाठी काम करीत आहे. या मुलांचे आणि महिलांचे शिक्षण, व्यवसाय यांच्या माध्यमातून सबलीकरण करण्याचा संकल्प या संस्थेने सोडला आहे.
‘बिल्ड वन आर्टिस्ट’ या चित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून मुलांच्या कलागुणांना वाव देण्याचे संस्थेचे उद्दिष्ट आहे. या चित्रांच्या विक्रीतून मिळणारा निधी त्या त्या मुलावर खर्च केला जाणार आहे.
२६ डिसेंबरला दुपारी ४ वाजता या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येईल. हे प्रदर्शन ३० डिसेंबपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ दरम्यान खुले राहील.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Dec 2012 रोजी प्रकाशित
वंचित मुलांनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन
त्यांच्याकडे स्वत:च्या पैशाने रंग, ब्रश, कॅनव्हास घेण्याइतकेही पैसे नाहीत, पण कल्पकता आणि कलेच्या देणगीने त्यांचा खिसा पुरेपूर भरला आहे. प्रत्येकाचा ब्रशचा फटकारा एक वेगळी कहाणी सांगतो. कधी रस्त्याच्या कडेला, रात्रीच्या थंडीत पानाच्या बाकडय़ावर मुटकुळं करून झोपलेलं निष्पाप बालपण.
First published on: 23-12-2012 at 12:57 IST
मराठीतील सर्व रविवार वृत्तांन्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Exhibition of picture painted by denuded children